सत्तेच्या मोहासाठी इकडून तिकडे उड्या मारणं चुकीचं

पर्येचे आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचा फुटीर आमदारांना सल्ला

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सत्तेच्या मोहासाठी इकडून तिकडे उड्या मारणं चुकीचं असल्याचं मत पर्येचे आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केलं. ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे सिनिअर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी त्यांच्याशी बातचित केली असताना त्यांनी आपलं मत मांडलं.

पूर्वीपेक्षा विधानसभेचं कामकाज आता सुधारतंय

मागील 5 वर्षांतील विधानसभेच्या कामकाजाविषयी बोलताना राणे म्हणाले, मागच्या 5 वर्षांत बरेच नवीन चेहरे राजकारणात आले, तर काही जुने आहेत. नव्या चेहऱ्यांमधील काहीजण खरंच अभ्यासू आहेत, जी चांगली गोष्ट. आजकाल ज्या तऱ्हेने विधानसभेचं कामकाज चालू आहे, ते खरंच प्रशंसनीय आहे. पूर्वीपेक्षा विधानसभेचं कामकाज आता सुधारतंय. राजकारणात पदार्पण केलेली नवीन मंडळी ही सुशिक्षित असल्यानं विधानसभेत उगाच आरडाओरड होत नाही. त्याचप्रमाणे सरकार कुठे कमी पडतंय याविषयी ते वेळोवेळी सांगतायत, असं मत राणेंनी व्यक्त केलं.

लोकशाही मजबूत करण्यासाठी सरकारने विधानसभेत विषय मांडावेत

गेल्या 50 वर्षांच्या विधानसभेतील प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले, गेली 50 वर्षं मी लोकांच्या हिताचे विषय विधानसभेत मांडत आलोय, ज्यातील काही मंजुरही झाल. माझं स्पष्ट मत आहे, की जर लोकशाही मजबूत करायची असेल, तर सरकारने ज्या काही अडीअडचणी असतील, त्यावर विधानसभेत आवाज उठवणं आवश्यक आहे.

इकडून तिकडे उड्या मारणं चुकीचं

सत्तेच्या मोहासाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या आमदारांना सल्ला देताना राणे म्हणाले, आपण लोकनेता म्हणून विधानसभेत निवडणूकीला उभं राहतो, तेव्हा जे काय ध्येय धोरण आहे ते लोकांना सांगून उभं राहतो. पण सत्तेसाठी, सत्तेच्या मोहासाठी इकडून तिकडे उड्या मारणं बरोबर नाही. ज्या आमदारांनी सत्तेच्या मोहापायी कायद्याचं उल्लंघन केलंय, ते आमदार लवकरच अपात्र ठरतील. विधानसभा अशा आमदारांच्या बाबतीत लवकरच निर्णय घेईल आणि फुटीर आमदारांना यातून नक्कीच धडा मिळेल असा मला विश्वास आहे, असं राणेंनी सांगितलं.

लोकउपयोगी पक्ष नक्कीच पुढे जातील

आज गोव्याच्या राजकारणात अनेक नवे पक्ष उदयास आले आहेत. त्यावर आपलं मत व्यक्त करताना राणे म्हणाले, एखादा पक्ष लोकउपयोगी असेल तर तो नक्कीच पुढे जाईल, चांगलं काम करेल. मात्र खोटी आश्वासने देऊन स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पक्षांचा उदय झाला आहे, ते सफल होऊ शकणार नाहीत.

अद्याप निर्णय नाही

आगामी विधानसभा निवडणूक २०२२ लढविण्याबाबत राणेंनी अद्याप काहीच ठरवलेलं नसल्याचं सांगितलंय. येणाऱ्या काळात याविषयात काय तो निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!