‘पार्टी व्हिथ अ डिफरंस’च्या सरकारात ताळमेळ नसल्याचं उघड

महिला काँग्रेस अध्यक्ष बिना शांताराम नाईकांची बोचरी टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यातील भाजप सरकारचा प्रशासनावरील ताबा शुन्य झाला आहे. आज सरकारच्या विवीध खात्यांमध्ये कसलाच समन्वय नाही हे परत एकदा उघड झालं आहे. गोव्यातील दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेले आदेश हे दोन दिवसांमागे शिक्षण खात्याने जारी केलेल्या आदेशांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. यावरुन ‘पार्टी व्हिथ अ डिफरंस’च्या सरकारात ताळमेळ नसल्याचं परत एकदा उघड झाल्याची बोचरी टीका महिला काँग्रेस अध्यक्ष बिना शांताराम नाईक यांनी केली आहे.

हेही वाचाः फोडणी महागली! इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती भिडल्या गगनाला

शिक्षण तसंच उच्च शिक्षण संचालनालयाचे आदेश

शिक्षण खात्याच्या संचालकांनी 4 जून रोजी एक आदेश जारी करुन सर्व व्यवस्थापकीय कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी 7 जून पासून पूर्ण वेळ शिक्षण संस्थात कामावर हजर रहावं असे निर्देश दिले. त्याच दिवशी उच्च-शिक्षण संचालकांनी आदेश जारी करुन कॉलेज आणि विद्यापीठ व्यवस्थापकीय कर्मचारी तसंच शिक्षकांना 7 जून पासून गोवा विद्यापीठात हजर राहण्याचे निर्देश दिले. तसंच कॉलेज शिक्षकांना आपल्या कॉलेजीसमध्ये 8 जून 2021 पासून पूर्णवेळ कामावर हजर राहण्यास सांगितलं, असं बिना नाईक यांनी निदर्शनास आणून दिलंय.

हेही वाचाः Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल

दक्षिण-उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे दोन वेगळे आदेश

6 जून 2021 रोजी दक्षिण तसंच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळे आदेश जारी करून कोविड महामारीमुळे वाढविलेल्या कर्फ्यू काळात शाळा- कॉलेजेस तसंच इतर शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सदर आदेशात केवळ परीक्षा देणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल केल्याचं नमुद करण्यात आल्याचं बिना नाईक यांनी म्हटलंय.

हेही वाचाः कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटकं! मुख्यमंत्री बदलले जाण्याच्या चर्चांना उधाण

नेमका कुणाचा आदेश पाळायचा?

गोव्यातील तमाम शैक्षणिक संस्थात काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर आणि व्यवस्थापन कर्मचारी यांनी नेमका कुणाचा आदेश पाळावा अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे, असा प्रश्न बिना नाईक यांनी विचारला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी घरी रहावे की 4 जून रोजीच्या शिक्षण खात्याच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कामावर हजर रहावं हे डॉ. प्रमोद सावंतानी स्पष्ट करावं, अशी मागणी बिना नाईक यांनी केली आहे.

हेही वाचाः दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

यावरुन भाजप सरकारमध्ये एक वाक्यता नसल्याचं उघड

6 जून रोजी जारी केलेले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणि दोन दिवसांपूर्वीचे शिक्षण खात्याचे आदेश यावरुन भाजप सरकारमध्ये एक वाक्यता नसल्याचं परत एकदा उघड झालं आहे. शिक्षण आणि गृह खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचे हे उदाहरण आहे. स्वतःला पार्टी व्हिथ अ डिफरंस म्हणणारं भाजपचं सरकार आज मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद मिटवण्यातच व्यस्त आहे, अशी टीका बिना नाईक यांनी केली आहे.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर पुरवली तातडीची वैद्यकीय मदत

मुख्यमंत्री, त्वरित स्पष्टीकरण द्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील आदेशाने तयार केलेला सावळा गोंधळ बंद करण्यासाठी त्वरित स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आज शिक्षक, कर्मचारी आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम भाजप सरकार करत आहे, असा आरोपही बिना नाईकांनी केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!