बांद्यात होऊ शकतं, मग दोडामार्गात का नाही ?

दोडामार्गात महाराष्ट्र-गोवा सीमा खुली करण्यावरून शिवसेना-भाजप आक्रमक

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : महाराष्ट्र, गोवा राज्य हद्दीतील गेट खुली करण्यावरून आता दोडामार्गमधील शिवसेना व भाजपा दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यात कामाला जाणाऱ्या युवा-युवतींसाठी जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी बांदयाची लाठी हटवू शकतात तर मग दोडामार्ग वासीयांना जिल्हा प्रशासनचे काय वाकडे केले आहे? दोडामार्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत नाही का? नेहमी दोडामार्गवरच अन्याय केला जातो, असा सवाल उपस्थित करत येत्या दोन दिवसात दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामाला जाणाऱ्या नागरिकांसाठी घालण्यात आलेली पोलीस लाठी न हटवल्यास आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा सक्त इशारा शिवसेनेचे उपजिल्हासंघटक गोपाळ गवस व भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिला आहे.

श्री. गवस यांनी याबाबत दोडामार्ग पोलीस निरीक्षक आर.जी. नदाफ यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. गेट खुली न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर भाजपाचे युवा नेते चेतन चव्हाण यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. चव्हाण यांनी तर थेट गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधत दोडामार्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना थेट गोवा प्रवेश मिळावा अशी विनंती केली आहे. त्याला मुख्यमंत्री सावंत यांनी ग्रीन सिग्नल दिला असून गोवा सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही दिली आहे.

गवस यांनी तर दोडामार्ग तालुक्यातील गोवा महाराष्ट्र हद्दीतील गेट खुली करावी, कोरोनाचा प्रादुर्भाव आता सिंधुदुर्ग व गोव्यात कमी झालेला असल्याने प्रवाशी तसेच कामाकरिता गोवा येते जात असतात. मात्र गेट बंद असल्यामुळे त्रास होतो. काही लोकांना तर वैद्यकीय उपचारासाठी गोवा येते जाण्यासाठी टेस्ट करून जावे लागत आहे. काही येजा करून नोकरीकरता जातात, त्यानासुद्धा टेस्ट करणे शक्य नाही.

शनिवारपासून पासून बांदा-पत्रादेवी गेट सुरु करण्यात आली. त्यामुळे साहजिकच दोडामार्गच्या दोन्ही गेट सुरु होणे क्रमप्राप्त होते. परंतु या दोन्ही गेट सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे दोन दिवसात गेट सुरु करावी, अन्यथा गोवा-दोडामार्ग मार्गावरच दोन दिवसात रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा गोपाळ गवस यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!