कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच? लोकप्रतिनिधींकडूनच नियमांची पायमल्ली

सांत आंद्रे आमदार फ्रान्सिस सिल्वेरांची गाडी काळ्या काचांची; 'गोवन वार्ता लाईव्ह'च्या कॅमेऱ्यात स्पॉट

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः कायद्याने चारचाकी वाहनांवर काळ्या काचा लावण्यास बंदी आहे. हा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं मंत्री मॉविन गुदिन्होंनी मागे म्हटलं होतं. राज्यात नियम मोडणाऱ्यांवर तशी कारवाई होतेय. मात्र लोकप्रतिनिधींकडूनच या नियमाची पायमल्ली होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मंगळवारी भाजप राज्य कार्यकारिणीची पणजीत बैठक झाली. या बैठकीला उपस्थिती लावलेल्या सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांची पूर्ण काळ्या काचांची गाडी ‘गोवन वार्ता लाईव्ह’च्या कॅमेऱ्यात पुन्हा एकदा स्पॉट झालीये.

नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का?

चारचाकींवर काळ्या काचा लावून अनेकजण मिरवतात. अशांना अद्दल घडवण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. गाडीला काळ्या काचा लावणाऱ्यांवर आणि सायलेन्सरमधून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आता कडक कारवाई केली जातेय. तसे निर्देश वाहतूक पोलिसांनाही देण्यात आलेत. मात्र सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांची पूर्ण काळ्या काचांची गाडी पाहिल्यावर हा नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्न विचारावासा वाटतो.

‘गोवन वार्ता लाईव्ह’च्या कॅमेऱ्यात स्पॉट

या पूर्वी 22 फेब्रुवारी रोजी गोवन वार्ता लाईव्हने आमदार सिल्वेरा यांची हीच काळ्या काचांची गाडी आपल्या कॅमेऱ्यात स्पॉट केली होती. त्यानंतरही त्यांनी मोडलेल्या या वाहतूक नियमाबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं ऐकिवात नाही. आता यावेळी तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल का? असा प्रश्न आहे.

आमदाराकडे उत्तर नाही

आमदार सिल्वेरा यांना त्यांच्या या गाडीविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी साधं उत्तर देणंही महत्त्वाचं मानलं नाही. त्यामुळे त्यांनी सरळ सरळ वाहतूक नियमांचा भंग केलाय हे उघड आहे. कायद्याने चारचाकी वाहनांवर काळ्या काचा लावण्यास बंदी असताना आमदारांच्या गाड्या मात्र काळ्या काचा का? हा प्रश्न आता लोक विचारु लागलेत. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!