IPLAuction2021 | गोव्याच्या क्रिकेटरची आयपीएलसाठी निवड

सुयश प्रभुदेसाईची आरसीबीकडून २० लाखांना खरेदी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्याचा युवा क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाई याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) २० लाख रुपये या मूळ किमतीत आपल्या संघात घेतलं आहे.

सुयशची चमकदार कामगिरी

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत सुयशने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच्या या स्पर्धेतील खेळीमुळे त्याच्यावर आयपीएलमधील संघमालकांची नजर होती. अखेर आरसीबीने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. स्वप्नील अस्नोडकर आणि शादाब जकाती यांच्यानंतर आयपीएलमध्ये निवड झालेला सुयश हा तिसरा गोमंतकीय क्रिकेटपटू ठरला आहे.

संदीप नाईक यांचा शिष्य

सुयश हा मूळचा तरवळे – शिरोडा येथील. त्याचे वडील, काका हे क्रिकेटपटू, नियमितपणे राज्यस्तरीय पातळीवर स्पर्धांत खेळतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत सुयश क्रिकेट मैदानावर आला. त्याचं शालेय शिक्षण मडगावातील महिला नूतन हायस्कूलमध्ये झालं. त्याच कालावधीत वयाच्या अकराव्या वर्षी तो फातोर्डा आरसीसी केंद्राचे क्रिकेट प्रशिक्षक संदीप नाईक यांच्या नेटमध्ये प्रशिक्षणासाठी आला. काही वर्षांपूर्वी सुयश दुखापतीने त्रासला होता. पण त्यावर मात करत सुयश नव्या उमेदीने मैदानावर उतरला.

शैलीदार फलंदाज आणि गोलंदाज

६ डिसेंबर १९९७ रोजी जन्म झालेला सुयश हा उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६ सामन्यांच्या २४ डावांत ९२२ धावा केल्या आहेत. १३५ ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या असून त्याने १ शतक व ६ अर्धशतके लगावली आहेत. लीस्ट ‘ए’मध्ये त्याने २४ सामन्यांतील २३ डावांत ५४९ धावा केल्या असून त्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२०मध्ये त्याने १७ सामन्यांमध्ये १६ डाव खेळले असून त्यात ३५७ धावा केल्या आहेत. नाबाद ६० धावा ही त्याची उत्तम कामगिरी असून एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे.

हेही वाचाः गोव्याच्या सुपुत्राची डेकोरेटिव्ह लायटिंग क्षेत्रात गगनभरारी

क्रिकेटमध्ये झटपट छाप

२०१९ -२० मोसमात २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत सुयशने गोव्याचं नेतृत्व केलं. चार सामन्यांत त्याने दोन अर्धशतके केली. हरियाणाविरुद्ध नाबाद ५२ , तर हिमाचलविरुद्ध ८० धावांची खेळी केल्यानंतर त्याची सय्यद मुश्ताक अली करंडक टी -२० स्पर्धेसाठी गोव्याच्या सीनियर संघात निवड झाली. त्या स्पर्धेतील पहिल्या लढतीत गोव्याने बडोद्यास पराभवाचा धक्का दिला, त्यात सुयशची नाबाद ६० धावांची खेळी निर्णायक ठरली. गतमोसमात विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेतही तो खेळला.

हेही वाचाः IPLAuction2021 | आपल्या युवीचा रेकॉर्ड ख्रिस मॉरिसने तोडला! तब्बल इतक्या कोटींची बोली

सुयशने मानले जीसीएचे आभार

गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई व विनोद फडके, सध्याचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव विपुल फडके, जीसीएचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, फिजिओ आदींचे सुयशने मनःपूर्वक आभार मानले आहेत. “जीसीएने माझी नेहमीच पाठराखण केली. त्यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनामुळे आयपीएलपर्यंतचा प्रवास शक्य झालेला आहे, मी साऱ्यांचा ऋणी आहे, ‘ असं सुयश सांगतो.

मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट करून सुयशचं अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुयश प्रभुदेसाईचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून सुयशला आयपीएलमध्ये त्याची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात.

यापूर्वी गोव्यातर्फे स्वप्नील अस्नोडकर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. शादाब जकाती हा आरसीबी व गुजरात लॉयन्स या संघांकडून खेळला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!