गोव्यात लवकरच ‘आयपीडी’ सेवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बर्‍याचदा पाहिलं गेलंय की व्यक्तीला हे माहीत असतं की त्याला ड्रग्स/अल्कोहोलचं व्यसन आहे आणि त्यातून तिला बाहेरही पडायचं असतं. परंतु काही गैरसमज किंवा गोंधळांमुळे व्यक्तीला उपचार घेण्याची भीती वाटते. पण आता घाबरायची गरज नाही. कारण गोव्यात लवकरच सुरू होतंय देशातील पहिलं इन पेशंट केअर सर्व्हिस देणारं अॅडिक्शन ट्रिटमेंट फॅसिलिटी सेंटर.

ड्रग ट्रिटमेंट क्लिनिक

सध्या सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण मुलं-मुली जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांची चव चाखणारे आज त्याच्या गर्ततेत आपसूकच सापडलेत. गोव्यात अशा तरुणांचं प्रमाण वाढतंय. व्यक्ती व्यसनाच्या आहारी अगदी सहज जाते. पण त्यातून बाहेर पडताना मात्र तिला प्रचंड आटापिटा करावा लागतो. अशाच रुग्णांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम हे ड्रग ट्रिटमेंट क्लिनिक करणारेय. म्हापसा येथील जिल्हास्तरीय इस्पितळात आऊटपेशंट केअर (ओपीडी) असलेलं ड़्रग ट्रिटमेंट क्लिनिक फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेलं. नोडल अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय अधिकारी (मनोचिकित्सका) एक सल्लागार आणि परिचारिका या केंद्राचं काम पाहतात. देशातील पहिलं इन पेशंट केअर (आयपीडी) सर्व्हिस देणारं अॅडिक्शन ट्रिटमेंट फॅसिलिटी गोव्यात सुरू होणार असल्याची माहिती म्हापसा येथील जिल्हास्तरीय इस्पितळाचे ड्रग ट्रिटमेंट क्लिनिकचे मेडिकल प्रमुख डॉ. रवींद्र पाटील यांनी दिलीये.

गोव्यात कुठे सुरू होणार क्लिनिक

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हास्तरीय इस्पितळांत हे केंद्र सुरू होणार असल्याचं समजलंय. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून अॅडिक्शन ट्रिटमेंट फॅसिलिटीसाठी मान्यता मिळाली असून काही महिन्यानंतर हे क्लिनिक सुरू होणारेय. या आयपीडी केंद्रांसंबंधित काम सध्या सुरू आहे. या नवीन केंद्रासाठी लागणाऱ्या स्टाफची रिक्रुटमेंट प्रक्रियाही सध्या सुरू आहे. इनपेशंट केअर सुरू होणार असल्याने त्या योग्य नूतनीकरणाचं कामही सुरू आहे. जिल्हास्तरीय इस्पितळामध्ये यापुढे ओपीडी आणि आयपीडी अशा दोन्ही सेवा सुरू राहणार असल्याचं देखील डॉ. पाटील यांनी स्पष्ट केलंय.

रुग्णांना ठेवणार इस्पितळात

आतापर्यंत जिल्हास्तरीय ड्रग ट्रिटमेंट क्लिनिकमध्ये ओपीडी उपलब्ध होती. व्यसनमुक्त होऊ पाहणारे रुग्ण इस्पितळात यायचे आणि औषध घेऊन जायचे. मात्र आता व्यवसनमुक्तीसाठी दखल होणाऱ्या रुग्णांना इस्पितळातच ठेवलं जाणार असून पूर्णतः डिटॉक्सीफाई झाल्यावर रुग्णांना घरी पाठवण्यात येईल. त्यानंतर ओपीडीद्वारे त्यांची सबस्टिट्युशन थेरपी सुरू राहणार आहे.

आयपीडी सेवाही विनामूल्य

नशामुक्तीसाठी रुग्णांना सुरुवातीलाच देण्यात येणार्‍या औषधांशी सुसंगत व्हायला आठ-दहा दिवसांची कालावधी लागतो. या कारणास्तव इस्पितळात दाखल करण्यात येतं. आणि
डिटॉक्सीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना घरी पाठवलं जातं. सध्या व्यसनमुक्त होण्यासाठी रुग्ण आपल्या कुटुंबीयांसोबत येऊन औषध घेऊन घरी जातात. या औषधांमुळे आपण पूर्णतः बरं होणार असा विश्वास त्यांच्यात असत नाही. आयपीडी सुरू झाल्यावर ही समस्या निकाली लागेल. इथेच रुग्णांना औषधंही मिळणार आणि त्यांची पूर्णतः काळजीही घेतली जाईल. मुख्यतः ओपीडीप्रमाणे आयपीडी सेवाही विनामूल्य असणारेय. सध्या व्यसनमुक्तीसाठी डिटॉक्सीफिकेशन केंद्र आहे. आता हे बंद करून अमलीपदार्थ आणि दारूपासून व्यसनमुक्तीसाठी एकच आयपीडी केंद्र असणारेय. या केंद्रात हेरॉईन, एलएसडी, एमडीएमए यासारखे अमली पदार्थ तसंच दारू या सर्वांपासून रुग्णांना डिटॉक्स केलं जाणारेय, अशी महिती डॉ. पाटील यांनी दिलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!