लज्जास्पद! …म्हणे मराठे ‘इन्वेडर्स’

गोवा पर्यटन खाते बनले टीकेचे लक्ष्य

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोव्याचं मुख्यमंत्रीपद क्षत्रिय मराठा समाजातून आलेले डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठे हा विषय बराच संवेदनशील बनू लागलाय. कळंगुटमधील शिवजयंती मिरवणूक असो किंवा आरजीच्या सभेत एका फादरने मराठ्यांना आक्रमणकर्ते म्हटल्याचे प्रकरण असो. लगेच हे विषय व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता तर चक्क सरकारी पर्यटन खातेच मराठ्यांवरून अडचणीत आलंय.

पर्यटन खात्यानं आपल्या ट्वीटर हॅण्डलवर आग्वाद किल्ल्याचा उल्लेख करताना पोर्तुगिजांना डच आणि मराठे आक्रमणकर्त्यांपासून रक्षण करण्यासाठी हा किल्ला महत्वाचा ठरला,असा उल्लेख केला. कुणीतरी ही चुक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच चुकीची दुरूस्ती करणारं नवं ट्वीट केलं आणि त्यात आक्रमणकर्ते हा उल्लेख केवळ डच यांना संबोधीत केल्याचं स्पष्टीकरणं केलंय. या स्पष्टीकरणामुळे पर्यटन खातं अडचणीत आलंय. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पर्यटन खात्याला ह्याच विषयावरून पकडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना इन्वेडर्स म्हणणाऱ्या पर्यटन खाते आणि भाजप सरकारवर त्यांनी तोफ डागलीय.

बाबू म्हणतात चौकशी करू

शिवाजी महाराज हे गोव्यातील असंख्य हिंदूंचे दैवत आहे. महाराजांना मानणारे आणि त्यांना आदर्श मानणारे लोक गोव्यात मोठ्या संख्येने आहे. अलिकडच्या काळात गोव्यातल्या कानाकोपऱ्यात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. राज्याचे पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे प्रतिनिधीत्व करीत असलेला पेडणे तालुका म्हणजे शिवाजी महाराजांना देवस्वरूप मानणाऱ्यापैकी एक. आता त्यांच्या खात्याकडूनच मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधीत केल्याने त्यांच्यासाठीही ही अडचणीची बाब ठरलीय. ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर बाबू आजगांवकर यांनी तत्काळ या चुकीचा निषेध केलाय.एवढेच नव्हे तर ट्वीटर हॅण्डल करणाऱ्याची चौकशी करण्याचेही त्यांनी मान्य केलंय. पेडणे मतदारसंघातील त्यांच्या विरोधकांच्या हातात हे एक आयतेच कोलीत सापडलंय. दिगंबर कामत यांच्या ट्वीटरवरून आता त्यांनीही बाबू आजगांवकर यांना या चुकीवरून लक्ष्य करण्याचा बेत आखलाय. पेडणेचे मगोचे नेते प्रविण आर्लेकर यांनीही या गोष्टीचा निषेध करून शिवाजी महाराजांप्रती किंवा मराठ्यांप्रती अशी भावना व्यक्त करून सरकार उघडपणे पोर्तुगिज मानसिकतेचे प्रदर्शन घडवत असल्याची टीका त्यांनी केलीय. बाबू आजगांवकर यांनीही हा विषय गंभीरनेते घेऊन याची चौकशी करू,असे आश्वासन दिलंय.

हेही वाचा – मंत्रीपुत्रानं घेतल्या हायवे ठेकेदाराकडून दोन सेकंड हॅण्ड अलिशान कार

शिवाजी महाराज आणि गोमंतक

पोर्तुगिज राजवटीत तत्कालीन धर्मप्रसारकांनी मोठ्या प्रमाणात गोव्यात धर्मांतरण अवलंबिले होते. सक्तीने हिंदूंना ख्रिस्ती बनवलं जात होतं. त्यासाठी अन्यन्य छळ केला जात होता. हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना केली जात होती. मंदिरे उद्धस्त केली जात होती. आपल्या देवतांचं रक्षण करण्यासाठी हिंदू लोक जळीस्थळी धावत होते. शिवाजी महाराजांच्या कानी ही खबर पोहचली तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच बार्देशवर स्वारी केली होती. या स्वारीत त्यांनी अनेक ख्रिस्ती धर्मगुरूचा वध केला होता. या बार्देश स्वारीचा अभिमानाने उल्लेख इथले हिंदू करतात तर ख्रिस्ती लोकांत मात्र शिवाजी महाराजांची दहशत अजूनही आहे. शिवाजी महाराज हे आक्रमणकर्ते होते आणि त्यांनी आक्रमण करून धर्मरक्षकांची हत्त्या केल्याची भावना त्यांच्या मनांत अजूनही ताजी आहे. कळंगुट येथे 19 फेब्रुवारीच्या शिवजयंती मिरवणूकीला परवानगी नाकारल्यानंतर पुन्हा एकदा ही मानसिकता उफाळून आली होती. शिवजयंती मिरवणूकीमुळे येथील कायदा सुव्यवस्था बिघडेल,अशी भिती व्यक्त करून ही मिरवणूक रद्द करण्यात आली. यानंतर शिवप्रेमींनी हा विषय संवेदनशील बनवून 30 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात शिवजयंती मिरवणूकीचे आयोजन करून याचा वचपा काढला. सरकारनेही या मिरवणूकीत खो घालण्याचा प्रयत्न केला नाही.

हेही वाचा – धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झालाय ब्लड कॅन्सर

आरजीच्या सभेत फादर काय बोलले

सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरलेल्या रिव्होल्यूशनरी गोवन्स म्हणजेच आरजीच्या एका सभेत एका फादरने भाषण केलं होतं.या भाषणात एका फादरने मराठ्यांनी केलेल्या आक्रमणापासून गोव्याचे रक्षण सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी केलं आणि त्यामुळेच गोवा सुरक्षित राहीला,असं म्हटलं होतं. यावरून भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी आरजीवर तफान हल्लाबोल केला होता. आरजी ही संघटना पोर्तुगिजधार्जिण्या लोकांची मांडलिक आहे असाही आरोप करण्यात आला. यानंतर सदर फादरने खुलासा करणारा व्हिडीओही जारी केला होता.

इतिहास आणि संभ्रम

गोव्याचा इतिहास आणि संभ्रम या दोन्ही गोष्टी अनेकांना बुचकळ्यात टाकणाऱ्या ठरल्यात. 450 वर्षे प्रदीर्घ काळ हा प्रदेश पोर्तुगिज राजवटीत राहील्याने अजूनही पोर्तुगिज मानसिकता किंवा त्यांचे समर्थन करणारा घटक राज्यात आहे. पोर्तुगिजांचे मुख्य लक्ष हे हिंदूंचे धर्मांतरण हेच होते आणि त्यामुळे सुरूवातीपासूनच या राजवटीला धर्माचे स्वरूप प्राप्त झालंय. अशावेळी गोव्याच्या इतिहासाची व्याख्या इथला प्रत्येक धर्म आपल्या सोयीप्रमाणे करू लागलाय. शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली आणि पोर्तुगिजांना सळो की पळो करून सोडले. हिंदूंच्या रक्षणासाठी केलेली ही स्वारी पोर्तुगिज मात्र आपल्यावर आक्रमण केल्याचं समजत होते. सहजिकच त्यांच्या दृष्टीने ते आक्रमण होते परंतु पोर्तुगिजांच्या छळाखाली आणि दहशतीखाली वावरणाऱ्या हिंदूंसाठी मात्र शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांची स्वारी ही त्यांच्या रक्षणासाठीची धाव होती,असे वाटत होते.

शिवराय लोकप्रिय व्यक्तीमत्व

संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी नाटकं होत नाही तेवढी नाटकं ही गोव्यात धार्मिक उत्सवानिमित्त होतात. ह्या नाटकांत एतिहासिक नाटकांना मोठं महत्व आहे आणि या एतिहासिक नाटकांत शिवाजी महाराजाचं पत्र हे सर्वात लोकप्रिय आहे. बहुतांश गोवेकरांना शिवाजी महाराज हे नाटकांतूनच समजले. नार्वे येथे श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला होता. तसेच अगदी दक्षिणेपर्यंत महाराजांनी स्वारी केली होती,असे असंख्य उल्लेख इतिहासात सापडतात. या अनुषंगाने शिवाजी महाराजांना मानणारा एक मोठा घटक गोव्यात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!