जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात हस्तक्षेप: आज सुनावणी

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगावर मागील १८ महिन्यांहून जास्त काळ अध्यक्षपद रिक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगावर मागील १८ महिन्यांहून जास्त काळ अध्यक्षपद रिक्त आहे, तसेच ही  न्यायिक अधिकारिणी संस्था असल्यामुळे जिल्हा आयोगाच्या प्रशासकीय कार्यात कोणत्याही सरकारी खात्याला लुडबूड करता येत नसल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवार २० रोजी होणार आहे.      

सेबॅस्टियन व्हालिस यांनी खंडपीठात याचिका दाखल केली

या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सेबॅस्टियन व्हालिस यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी राज्य सरकार, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याचे सहाय्यक संचालक आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाला प्रतिवादी केले आहे.     

निवृत्त न्यायमूर्ती यू. व्ही. बाक्रे यांचा कार्यकाळ २६ फेब्रुवारी २०२० रोजी संपला

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे माजी अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती यू. व्ही. बाक्रे यांचा कार्यकाळ २६ फेब्रुवारी २०२० रोजी संपला. त्यानंतर त्या पदावर नवीन नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे आयोगाचे अध्यक्षपद मागील १८ महिने रिक्त आहे. राज्य सरकारने अध्यक्षपद भरण्यासाठी कोणतीच हालचाल केली नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. तसेच नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने १६ फेब्रुवारी २०२० आणि २३ मार्च २०२१ रोजी आदेश जारी करून या न्यायिक अधिकारिणी संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार तसेच जिल्हा आयोगाचे प्रशासकीय कार्यासाठी लागणारी सर्व अधिकार खात्याकडे असल्याचे म्हटले आहे.

वरील दोन्ही आदेश रद्द करण्याची मागणी

तसंच जिल्हा आयोगाचे नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक प्रमुख असल्याचा दावा वरील आदेशात केला आहे. या प्रकरणी याचिकादाराने खंडपीठाकडे वरील दोन्ही आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्य आयोगावर लवकर अध्यक्ष नियुक्त करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी याचिकेत केली आहे.

हा व्हिडिओ पहाः POLICE| पोलिस खात्याच्या भरतीला प्रचंड प्रतिसाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!