राष्ट्रपती सपत्नीक लग्नाला येणार असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, त्याचं झालं असं…

एका लग्नाची ‘भारी’ गोष्ट

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

वेर्णा : लग्न म्हटलं की केवढी तयारी आणि किती मानपान असतात हे वेगळं सांगायला नको. अशातच राज्यात झालेल्या एका लग्नाची खास गोष्ट समोर आली आहे. चक्क राष्ट्रपतींनी सपत्नीक एका लग्नाला हजेरी लावली. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे या लग्नाचं राष्ट्रपतींना आमंत्रणही नव्हतं. अशावेळी ते नेमके लग्नाला गेले का हा प्रश्नही अनेकांना पडलाय. पण हीच खरी गंमत आहे.

त्याचं झालं असं…

त्याचं झालं असं की राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) हे गोवा मुक्तिदिनानिमित्त दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज (२० डिसेंबरला) त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम होता.

यावेळी ते वेर्णातील म्हाळसा मंदिरात देवीचं दर्शन घेणार होते. मात्र आधीच एका कुटुंबानं मुहूर्त काढून या मंदिरात लग्नाचं नियोजन केलं होतं.

सावंत कुटुंबीयांच्या मुलाचं लग्न नार्वेकरांच्या मुलीशी होणार होतं. पत्रिका छापून आणि वाटूनही झालेल्या. अर्थात यातली एकही पत्रिका राष्ट्रपतींना देण्यात आलेली नव्हती. मात्र राष्ट्रपती या मंदिरात हजेरी लावणार आहेत ही बाब स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आली. त्यावेळी आधीच लग्नाचा बेत आखलेल्या सावंत आणि नार्वेकर कुटुंबाला मात्र चिंता सतावू लागली.

राष्ट्रपतींचा धाडसी निर्णय

हे लग्न पुढे ढकलावं लागणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. आधीच कोरोनामुळं अनेकांची लग्न पुढे ढकलली गेली होती. या सगळ्यात राष्ट्रपतींनाही लग्नाच्या आयोजनाची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला विश्वासात घेतलं आणि हे लग्न ठरलेल्या वेळेनुसारच ठरल्या दिवशी होईल, याची खबरदारी घेतली. इतकंच काय तर नवं दाम्पत्याला शुभाशीर्वादही दिले.

राष्ट्रपती कोविंद त्यांच्या पत्नी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हाळसा मंदिरात गेले. त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. आरतीही केली. विशेष म्हणजे लग्नाला हजेरी लावत वधू वरांना शुभेच्छा देत एक पत्रही भेट दिलं.

बिन बुलाए सेलिब्रिटी मेहमान

खरंतर लग्नाला प्रसिद्ध व्यक्ती किंवा सेलिब्रेटींनी हजेरी लावावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण चक्क राष्ट्रपती आपल्या लग्नाला येतील, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. अशावेळी दिप्तेश सावंत आणि ऐश्वर्या नार्वेकर यांना सुखद धक्का बसला तो राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या हजेरीनं.

चर्चा तर होणारच!

आयुष्यभर ते आता आपल्या लग्नाचा किस्सा रंगवून रंगवून सांगतील यात शंका नाहीच. पण यात गोष्ट कौतुक करण्यासारखी म्हणजे कदाचित सुरक्षेखातर प्रशासनानं त्यांचं लगेन पुढे ढकल्यासाठी विनंती केली असेल. पण राष्ट्रपतींनी यात पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. लग्नासाठीची तयारी, धावपळ, उत्साह, आनंद या सगळ्यावर त्यांनी विरजण न पडू देता खऱ्या अर्थानं सुंदर आणि आदर्श पाऊल उचललंय.

हा क्रार्यक्रम झाल्यानंतर राज्यपालांनी निरोप घेतला आणि ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

पाहा खास व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!