पतीपत्नी जोडीनं निवडणुकीला उभे राहिले, जोडीनं पडले, ‘या’ पालिकेतला इंटरेस्टिंग निकाल

तब्बल ५ टर्म सलग निवडून येणारेही गारद, संजय कोमरपंत यांचा रिपोर्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : काणकोण पालिकेच्या निवडणुकीत जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी यावेळी पसंत केले नसून त्यात माजी उपनगराध्यक्ष किशोर शेट, दयानंद पागी, गुरु कोमरपंत, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, दिवाकर पागी यांना हार पत्करावी लागली तर किशोर शेटच्या जागी पांडुरंग उर्फ़ धीरज नाईक गावकर, दयानंद पागीच्या जागी सायमन रेबेलो, गुरु कोमरपंतच्या जागी शुभम कोमरपंत, रत्नाकर धुरीच्या जागी गंदेश मडगावकर, तर दिवाकर पागी याच्या जागी लक्ष्मण उर्फ़ बाकल पागी या नवख्या उमेदवाराना मतदारानी पसंती दिली. मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याने आणि काही राजकीय हितशत्रूनी षडयंत्र रचल्यामुळे पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया पराभूत उमेदवारांनी व्यक्त केली.

२५ वर्षानंतर शह

१९८७ पासून नगरपालिका निवडणूक स्वतः लढविणारे आणि आपल्या समर्थकाला विजयी करून आणण्याबरोबरच आपल्या मुलीलाही निवडून आणून काणकोण नगरपालिका मंडळावर प्रत्येकवेळी आपली वेगळी छाप ठेवलेले माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी यांना नवख्या गंदेश मडगावकर या तरुणाकडून राजबाग वार्डातून १०६ मतानी हार पत्करावी लागली.

त्याचप्रमाणे पाळोळे वार्डात दबदबा असलेले व गेली ४ टर्म निवडून आलेले माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी यांनाही लक्ष्मण उर्फ़ बाकलू पागी याच्याकडून ५६ मतांनी हार पत्करावी लागली. दिवाकर पागी हे काणकोण भाजपामंडळाचे सरचिटणीस आहेत. माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी याला सायमन रेबेलोकडून पाळोळे वार्डात २८५ मतानी हार पत्करावी लागली.

पती पत्नी गारद!

मास्तिमळ वॉर्डातून माजी उपनगराध्यक्ष किशोर शेट याना त्याचे गेल्या टर्मचे प्रतिस्पर्धी पांडुरंग उर्फ़ धीरज नाईक गावकर कडून ३५६ मतानी हार पत्करावी लागली. तर किशोर शेट याची पत्नी जयश्री किशोर शेट ही सुद्धा सुप्रिया शेखर देसाई याच्याकडून २५ मतानी देळे वॉर्डमधून पराभूत झाली.

पालिकेत ५ माजी उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष पराभूत

नगर्से वॉर्डमधून माजी उपनगराध्यक्ष हेमंत नाईक गावकर मात्र पुन्हा पालिकेत पोहचले असून त्यानी माजी नगराध्यक्ष रंगनाथ नाईक गावकर याचा ५५ मतानी पराभव केला. पणसुले वॉर्डात भाजपाचे माजी उपाध्यक्ष विशाल देसाई, महादेव देसाई यानी पुढे आणलेला नवखा उमेदवार नादीन फर्नाडिस यानी विल्सन फर्नाडिस या उमेदवाराचा ७७ मतांनी पराभव केला आहे. पाटणे वॉर्डमधून माजी उपनगराध्यक्ष मारुती उर्फ़ गुरु कोमरपंत याचा काणकोणचे आमदार इज़िदोर फर्नाडिस याचा खदा समर्थक शुभम सुधाकर कोमरपंत यानी मारुती कोमरपंत याचा २४२ मतानी पराभव केला.

सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या सावंतवाडा, भगतवाडा प्रभागात माजी नगराध्यक्षा नीतू समीर देसाई या आपला गड राखण्यास समर्थ ठरल्या. त्यांनी नवख्या उमेदवार सनिजा देसाई याचा ५५ मतांनी पराभव केला. किंदळे वार्डातून रमाकांत नाईक गावकर यानी समर्थन दिलेल्या नवख्या उमेदवार अमिता चंद्रहास पागी यानी नवख्या उमेदवार रोशन सुशांत पागी याचा ५५ मतांनी पराभव केला.

१) काणकोण पालिकेत नवा चेहरा म्हणून निवडून आलेले गंधेश मडगावकर, लक्ष्मण उर्फ़ बाकल पागी तसेच माजी नगराध्यक्ष सायमन रेबेलो, हेमंत नाईक गावकर, आमदार इज़िदोर फर्नाडिस व नंदिप भगत.

२) पणसुले वॉर्डमधून निवडून आलेले नादीन फर्नाडिस यांच्यासमवेत विशाल देसाई, महादेव देसाई आणि इतर.

३) पाटणे वॉर्डमधून निवडून आलेले शुभम कोमरपंत.

४) पाळोळे देवाबागमधून निवडून आलेल्या सारा शंबा देसाई.

५) सावंतवाडा वॉर्डमधून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्षा नीतू समीर देसाई.

६) चावडी वॉर्डमधून निवडून आलेले गाडीवरुन मिरवणुकीत सहभागी झालेले रमाकांत नाईक गावकर.

७) आपल्या समर्थकासमवेत माजी नगराध्यक्ष रमा नाईक गावकर.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!