चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळंगुट पोलिसांकडून अटक…

महाराष्ट्र, गोवा, उत्तरप्रदेशमधील अनेक चोऱ्यांत सहभाग

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : रत्नागिरी येथे चार दुकाने फोडून गोव्यात पसार झालेल्या चार जणांच्या उत्तर प्रदेशमधील आंतरराज्य टोळीला कळंगुट पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र, गोवा व उत्तर प्रदेशमधील अनेक चोऱ्यांच्या प्रकरणात या टोळीचा हात असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचाःभाजप सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा : मायकल

दुकानातून रक्कम व इतर मौल्यवान वस्तू झाल्या लंपास

संशयित एम. डी. सोफीयान, फिरोज आलम, एम. डी. अझरुद्दीन व फैझान अली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते मुळ कानपूर उत्तर प्रदेशमधील असून सध्या गवंडी तिलकनगर मुंबई येथे वास्तव्यास होते. रत्नागिरी शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास चार दुकाने फोडण्याचा प्रकार घडला होता. या दुकानातून रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लंपास झाल्या होत्या. या प्रकरणातील चोरटे गोव्यात पसार झाल्याचे रत्नागिरी शहर पोलिसांनी गोवा पोलीसांना कळवले होते. शिवाय त्यांची सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली छायाचित्रेही पाठवली होती.
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…

एकाला हॉटेलच्या खोलीवरून पकडून अटक

संशयित आरोपी पहाटे चोरी करून थेट रेल्वे पकडून रत्नागिरीहून मडगावला आले होते. तेथून ते सकाळी कळंगुटला आले व एका हॉटेलमध्ये उतरले होते. संशयित आरोपी कळंगुटमध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कळंगुट पोलिसांनी दिवसभर संशयितांना पकडण्यासाठी काँबींग ऑपरेशन सुरू केले. संध्याकाळी तिघे संशयित कळंगुट समुद्रकिनारी फेरफटका मारताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी पकडले तर एकाला हॉटेलच्या खोलीवरून पकडून अटक केली.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

गोव्यातून माघारी जाण्यापूर्वी त्यांचा चोर्‍या करण्याचा बेत

चौकशीवेळी संशयितांनी महाराष्ट्रसह गोव्यात तसेच उत्तर प्रदेशात अनेक चोर्‍या केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच संशयितांचा गोव्यातून माघारी जाण्यापूर्वी येथेही त्यांचा चोर्‍या करण्याचा बेत होता, असेही उघडकीस आले आहे. पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉ. महेंद्र च्यारी, रूपेश साळगावकर, स्मितल बांदेकर, प्रितेश किनळेकर, गणपत तिळोजी व विजय नाईक या पथकाने ही कामगिरी केली. 
हेही वाचाः१३ जणांना आमिष दाखवून ७.३२ लाख रुपयांचा गंडा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!