उपमुख्यमंत्री आजगावकरांकडून महिलेचा अपमान

मदतीच्या आशेने आलेल्या महिलेला लाथाडलं

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

धारगळः नानाचे पाणी हा वारखंड पेडणे येथील ग्रामीण वाडा. जवळपास वीस ते तीस घरांची लोकवस्ती असलेला हा वाडा मोपा विमानतळाजवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. डोंगर भाग असल्यामुळे भूस्खलन (लँड्स्लाईड) होण्याच्या शक्यता अधिक आहे. घरांच्या वरच्या बाजूने असलेला डोंगर जर कोसळला, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता या वाड्यावर आहे. हीच समस्या लक्षात घेऊन एक स्थानिक महिला आशेचा किरण शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कार्यालयात गेली. मात्र तिथे त्या महिलेला अपमानास्पद वागणूक मिळाली.

‘तुमच्या मतांची आम्हाला गरज नाही’

नानाचे पाणी येथील सुमित्रा सुर्यकांत आंदुर्लेकर ही महिला संरक्षक भिंतीची मागणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री मनोहर (उर्फ) बाबू आजगावकर यांच्या कार्यालयात गेली होती. तिथे तिला ‘तुमची जे कामं करतात त्यांच्याकडे जाऊन मागणी करा’ असं उत्तर मिळालं. त्यावर सुमित्रा यांनी पुन्हा प्रश्न केला की ‘आम्ही तुम्हाला मतं देऊन निवडून आणतो, मग आता आम्ही कुणाकडे जायचे?’ तेव्हा आजगावकर म्हणाले, ‘तुमच्या मतांची आम्हाला गरज नाही.’ हे उत्तर ऐकून ती महिला माघारी आली. गुरुवारी आजगावकरांकडून घेण्यात येणाऱ्या सभेत हा अपमान झाला असल्याचं सुमित्रा आंदुर्लेकर यांनी सांगितलं.

हा अपमान केवळ एका महिलेचा नसून तमाम पेडणेकरांचा

‘मिशन फॉर लोकल’ संघटनेचे राजन कोरगावकर यांच्या कानी ही गोष्ट पडताच त्यांनी सुमित्रा आंदुर्लेकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. झाला प्रकार समजताच हा अपमान केवळ एका महिलेचा नसून तमाम पेडणेकरांचा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. कोरगावकर म्हणाले, उपमुख्यमंत्री आजगावकरांना हे शोभत नाही. एखाद्या स्त्रीचा अपमान करणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असे प्रकार पेडणेकर कधीच खपवून घेणार नाहीत. आम्ही आंदुर्लेकर कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं कोरगावकर म्हणाले.

सरकारी खात्यातून स्वतःच्या मुलासाठी हणजूण येथे बांधली संरक्षक भिंत

काही दिवसांपूर्वी हणजूण येथील एक प्रकार समोर आला होता. सरकारी खात्यातून स्वतःच्या मुलासाठी हणजूण येथे बाबू आजगावकरांनी संरक्षक भिंत बांधली होती. जर स्वतःसाठी संरक्षक भिंत बांधून घेता येते, तर पेडणेकरांसाठी का नाही ? असा प्रश्न मिशन फॉर लोकल संघटनेचे प्रवक्ते राजू नरसे यांनी उपस्थित केला. यातून असं दिसतंय की आजगांवकर यांच्या जवळपास फिरणाऱ्या लोकांचीच कामं होणार आणि सामान्य जनतेच्या पदरी मात्र निराशा पडणार.

हेही वाचाः बहुजन समाज, दलितांसाठी न्याय मागणं अपराध असल्यास तो मी पुन्हा पुन्हा करेन

या महिलेला जर न्याय मिळाला नाही, तर याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा मिशन फॉर लोकल या संस्थेने दिला आला.

हा व्हिडिओ पहाः Climate Change | Inside Story | मुरगाव शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!