राज्यांच्या सीमांवरील चेक पोस्ट बंद करण्याचे निर्देश

केंद्राकडून राज्यांना पत्र : जीएसटीमुळे गरज नसल्याचे स्पष्टीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: देशभरातील राज्यांच्या सीमेवरील परिवहन विभागाचे चेक पोस्ट बंद केले जात आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राज्यांना चेक पोस्ट बंद करण्यास सांगण्यात आले आहे. जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून राज्याच्या सीमेवर नियमित वाहतूक तपासणी चौक्यांची गरज नाही, असे पत्रात म्हटले आहे. बऱ्याच राज्यांनी चेक पोस्ट आधीच बंद केले आहेत. राज्यांत अजूनही चेक पोस्ट कार्यरत असतील तर ते लवकरच बंद करावेत. या निर्देशांनुसार राज्यातील दोडामार्ग, पत्रादेवी, चोर्ला घाट, पोळे, अनमोड येथील चेक नाके आता सरकारला बंद करावे लागणार आहेत.

राज्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमांवर हे नाके आहेत. या नाक्यांवर वाहनांची तपासणी होत होती. कोविड प्रमाणपत्र तपासणीचे कामही याच नाक्यांवरून केले जात होते. केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने केलेल्या सूचनेनुसार आता हे नाके लवकरच तेथून हटवावे लागणार आहेत. या नाक्यांवरील पोलिसांकडून वाहन चालकांची सतावणूक केली जाते, अशा तक्रारीही आल्या होत्या.

वाहने आणि चालकांचा डेटा ऑनलाईन

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर नियमित वाहतूक तपासणी चौक्यांची गरज नाही. वाहन आणि सारथी प्लॅटफॉर्मद्वारे वाहने आणि चालकांविषयीचा ऑनलाईन डेटा बनवण्यात आला आहे. जीएसटी लागू झाल्यापासून बहुतांश राज्यांमध्ये वाहतूक चेक पोस्ट रद्द करण्यात आले आहेत; परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पाँडिचेरी, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अजूनही वाहतूक तपासणी पोस्ट कार्यरत आहेत. ते बंद करून केंद्रीय मंत्रालयाला त्याची माहिती द्यावी.

राज्य सरकारांना राज्यांच्या सीमेवरील चेक पोस्टवर वाहनांच्या तपासणीतून मोठा महसूल मिळतो. पूर्वी वाहनांची तपासणी आणि कर वसुलीचे काम चेकपोस्टवर तैनात अधिकाऱ्यांकडून केले जात होते; परंतु आता सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. यामुळे हे चेकपोस्ट बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हा व्हिडिओ पहाः POT HOLES | आंदोलनाचा इशारा देताच कामाला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!