नुकसानीची पहाणी केली; मदत कधी?

देविदास गावकर | प्रतिनिधी
वाळपईः सत्तरीत पुरामुळे प्रचंड मोठं नुकसान झालंय. लोकांचे संसार अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. दरम्यान, या सगळ्याची केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पाहणी केलीये.
श्रीपाद नाईक, विश्वजीत राणेंनी केली नुकसानग्रस्त भागाची पहाणी
सोमवारी सकाळीच श्रीपाद नाईक आणि विश्वजीत राणेंनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सत्तरीतील वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळवी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही दिलं. यावेळी स्थानिकांशी दोन्ही नेत्यांनी चर्चाही केली. लोकांच्या व्यथा आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना पूर्ण मदत केली जाण्याबाबत आश्वस्तही केलंय.
शुक्रवारी पुराने केलं जनजीवन विस्कळीत
शुक्रवारी सत्तरीत पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. अनेकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झालं होतं. तसंच गोशाळेतही पुराच्या पाण्यात अडकून गुरं दगावली होती. या सगळ्याची पाहणी श्रीपाद नाईक आणि विश्वजीत राणे यांनी यावेळी केलीये.