अमानुष : विम्याच्या पैशांसाठी आई-वडिलांनीच केला मुलीचा खून

क्रूरपणाचा कळस गाठणारा लुधियाना इथला प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : लॉकडाऊनच्या कालावधीत गुन्हेगारीचे अतिशय क्रूर प्रकार समोर येताहेत. मुलीच्या नावे असलेल्या इन्श्युरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. लुधियानामध्ये हा प्रकार घडला आहे. या दाम्पत्याला आर्थिक अडचण सतावत होती. त्यामुळे ही कृती केल्याचं कळत आहे.

इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पिंकी आणि तिचा नवरा नरिंद्रपाल या दोघांनीही भारती या पिंकीच्या नऊ वर्षीय मुलीचा १९ जून रोजी खून केला. या दोघांनीही भारतीच्या नावावर २०१८ मध्ये अडीच लाख रुपयांची इन्श्युरन्स पॉलिसी विकत घेतली होती. पोलिसांनी सांगितलं की या दोघांनी २०१९ मध्ये तीन लाख रुपयांची जमीन खरेदी केली होती आणि हे त्या जमिनीचे हप्ते भरत होते. त्यांनी १.४९ लाखांचं कर्ज फेडलं होतं. मात्र उरलेलं कर्ज फेडायला त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी भारतीचा खून करुन तिच्या इन्श्युरन्सच्या पैश्यातून आपलं कर्ज भरण्याचा प्लॅन केला होता.

नरिंदरपाल हा आपली पत्नी आणि सावत्र मुलगी भारती ह्यांच्यासोबत राहत होता. तो पशुखाद्य बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता आणि त्याच कारखान्याने दिलेल्या घरात राहत होता. भारती झोपेत असताना ह्या दोघांनी तिला या कारखान्यामध्ये नेलं आणि पिंकी म्हणजे भारतीच्या आईने ओढणीने तिचा गळा आवळला.

सकाळी हे दोघेही भारती बेशुद्ध असल्याचा बनाव करत रुग्णालयात पोहोचले. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, नरिंदरपाल याला भारती आवडत नव्हती कारण ती त्याची सावत्र मुलगी होती. त्यामुळे तो तिला बऱ्याचदा मारहाणही करायचा.

या दोघांनीही सुरुवातील भारती नैसर्गिकरित्या मरण पावल्याचा दावा केला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालातून हे समोर आलं की तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे दोघेही कबूल झाले आणि आर्थिक अडचण असल्याने मुलीला मारल्याचं सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!