देशातला पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित !

केवळ 18 दिवसात उभारला प्रकल्प ; ऑक्सिजनची शुद्धता 96 टक्के !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गेले काही दिवस देशात ऑक्सिजन आणीबाणी सुरू आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या नेहमीच्या सवयीमुळं ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होते आहे. दरम्यान, देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर तातडीनं कार्यवाही करत महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद इथं देशातला पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. पंढरपूरचे सुप्रसिद्ध उद्योजक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून उस्मानाबाद इथल्या धाराशिव साखर कारखान्यात हा प्रकल्प आहे. अभिजित पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि समाजसेवेच्या ध्यासामुळे आज महाराष्ट्राला देशातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र अभिजित पाटील यांचं कौतुक होत आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी असून ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग, पुणे यांच्या तांत्रिक सहकार्यानं ऑक्सिजन निर्मिती करण्याचे धाडस दाखवलं. रात्र-दिवस काम सुरू ठेऊन अठरा दिवसातच प्रकल्पाचं काम पुर्ण करण्यात आलं. धाराशिव साखर कारखान्यात प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ झाला आहे. धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात काही बदल करून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला आहे आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के आली असुन शासन स्तरावर शुध्दता तपासणीसाठी ऑक्सिजनचे तीन बलून मुंबई येथील लॅबकडं पाठविण्यात आले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!