‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ कोवॅक्सीन लसीसाठीच्या औषधाचे उत्पादन करणार

भारत बायोटेक आणि आयआयएल यांच्यात औषध निर्मितीबाबत झाला तांत्रिक सहकार्य करार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशात लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच एक कंपनी म्हणजे राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अखत्यारीतील हैदराबाद येथील ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’, असून तिला केंद्र सरकार औषधनिर्मितीसाठी अर्थसहाय्य करणार आहे.

या संदर्भात भारत बायोटेक आणि आयआयएल यांच्यात कोव्हॅक्सीन लसीसाठी आवश्यक औषध निर्मितीबाबत तांत्रिक सहकार्य करार झाला आहे. इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड कंपनी, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपासून, लसीसाठी आवश्यक औषधाचे उत्पादन सुरु करणार असून, जुलै महिन्यात भारत बायोटेकला औषधाची पहिली खेप पाठवली जाईल, अशी माहिती, इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. आनंद कुमार यांनी दिली. इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड दर महिन्याला सुमारे 10-15 दशलक्ष लसींसाठी लागेल एवढा औषध पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सांगत सुरुवातीला 2-3 दशलक्ष मात्रांसाठी असेल आणि नंतर हे उत्पादन दर महिना 6-7 दशलक्षपर्यंत वाढवले जाईल, असे ते म्हणाले.

आयआयएल, आणखी एका कोविड-19 लसीसाठी काम करत असून त्याच्या प्राण्यांवरच्या चाचण्या सुरु आहेत. मानवासाठीची लस पुढच्या वर्षीपर्यंत येणे अपेक्षित आहे, असे डॉ कुमार यांनी सांगितले.  आपली औषधक्षमता वाढवण्यासाठी इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला 60 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!