ममता बॅनर्जींच्या लढ्याला आम्ही संघटितपणे बळकटी देणार

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांचा तृणमूल काँग्रेसला पाठिंबा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ममता बॅनर्जींच्या लढ्याला आम्ही संघटितपणे बळकटी देणार. गोव्यात आणि देशात केवळ ममताच परिवर्तन घडवून आणू शकतात. भाजपने ५ वर्षांत काहीच केले नाही, असं सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर म्हणालेत. पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसचे नेता डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत गावकर यांनी तृणमूल काँग्रेसला आपला पाठिंबा दर्शवलाय.

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. काहीच महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये गेलेले त्यांचे समर्थक आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं आमदार गावकर अधिवेशनानंतर तृणमूलमध्ये जाण्याची शक्यता दाट झालीये. त्यामुळे आगामी काळात या दिशेने काय घडामोडी होतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.

भाजपने लोकविरोधी धोरणं सुरू केली आहेत

गावकर हे दक्षिण गोव्यातील सांगे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सुरुवातीला त्यांनी २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दर्शवला होता, मात्र त्यानंतर त्यांनी माघार घेतली. गेल्या पाच वर्षांत गोव्यात आम्ही जे पाहिलं आहे ते म्हणजे भाजपने लोकविरोधी धोरणं सुरू केली आहेत. या सरकारमध्ये लोकांना त्रास होत आहे. देशात ममता बॅनर्जी यांच्या रूपाने सकारात्मक बदल होत आहे आणि म्हणूनच आम्ही तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असं गावकर म्हणाले.

ममतादीदी सबलीकरणाचं प्रतीक

मी आमदारकीचा राजीनामा देणार नाही. मात्र मी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपशी कसा लढा दिला हे आपण पाहिलं आहे. ती महिला सबलीकरणाचं प्रतीक आहे, असे कौतुकाचे शब्द गावकर यांनी काढले.

केवळ तृणमूलच मोदी सरकारचा पराभव करू शकते

तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो म्हणाले, गावकरांसारखे तरुण तृणमूलमध्ये सामील होत आहेत हे पाहून उत्साह वाटतो. केवळ तृणमूलच मोदी सरकारचा पराभव करू शकते, असा विश्वास फालेरोंनी व्यक्त केला.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!