मिशन फॉर लोकल संघटनेला महिलांचा वाढता पाठिंबा

महिलांसाठी उभारली उद्योग प्रशिक्षण केंद्रे

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

पेडणे : पेडण्यात राजन कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली मिशन फॉर लोकल संघटना अधिक वेगानं कार्यरत होत आहे. या संघटनेचे समाजकार्यात मोठे योगदान आहे. आपत्कालीन प्रसंगात लोकांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ही संघटना अनेकांना आधार बनली आहे. मागील दीड ते दोन वर्ष कोरोंनाच्या महामारीमुळे अनेक लोकांवर वाईट प्रसंग होते. अनेकांच्या घरात धड चूल पेटणे अवघड होते. अशावेळी गरजू लोकांना जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याचे काम मिशन फॉर लोकल संघटनेने केले. तौक्ते वादळ असो अथवा महापूर असो, लोकांपर्यंत जाऊन समस्या सोडवण्याचे काम या संघटनेने केले आहे.

मिशन फॉर लोकल संघटना महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारून प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. अध्यक्ष राजन कोरगांवकर यांच्या सौभाग्यवती रश्मी कोरगांवकर या पेडण्यातील महिलांना एकत्र आणून वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे. देऊळवाडा कोरगांव येथे महिलांसाठी उभारलेल्या प्रशिक्षण केंद्रास मोठा प्रतिसाद मिळत आहे. विणकाम, शिवणकाम इत्यादी कलांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.

आत्ताच भूतवाडी- विर्नोडा येथील महिलांना घरात केक बनवण्याचे प्रशिक्षण देऊन अभिमानास्पद कार्य केले आहे. पेडण्यातील महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी मदत करु, महिलांनी मिशन फॉर लोकल संघटनेशी संपर्क साधावा, आम्ही प्रशिक्षण देऊ, असे रश्मी कोरगांवकर यांची म्हटले आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालत आहेत. अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु अनेक महिला गृहिणी आहेत, अशा महिलांना घरबसल्या स्वतःचा छोटासा धंदा उभारण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरून घरात काहीअंशी मदत होईल असे मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगांवकर म्हणाले.

या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर अनेक महिला या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊन मिशन फॉर लोकल संघटनेला पाठिंबा देत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!