सत्तरी तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

सात महिन्यांत सापडले चाळीस रुग्ण : तीव्रता वाढण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई: वाळपई व सत्तरी तालुक्यातील गावांमध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत डेंग्यू विषाणू प्रामुख्याने शहरी भागात होता. वाळपई नगरपालिका क्षेत्राव्यतिरिक्त ग्रामीण भागातही तो पसरला आहे. सामाजिक आरोग्य केंद्राच्या (सीएचसी) ताज्या अहवालानुसार गेल्या सात महिन्यांत सत्तरी तालुक्यात डेंग्यूचे सुमारे ४० रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचाः आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

कुठे किती प्रकरणं?

डेंग्यू हा विषाणू वाळपई शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक डोकेवर काढत असल्याचं दिसून येत आहे. नगरगाव पंचायतीकडून सुमारे २० प्रकरणे, तर वाळपई शहरासह वेळूस क्षेत्रात ७ प्रकरणे नुकतीच नोंदवली गेली. दरम्यान, सालेली, पिसुर्ले, ठाणे, झरमे, गुळेली, नागवे, कुडशे आणि भुईपाल या भागांत प्रत्येकी एका डेंग्यू रुग्णाची नोंद झाली आहे. वाळपई शहरातील विशेषतः सय्यदनगर आणि वेळ‍ूस भागातील रहिवाशांनी सांगितले की, जुलैच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागांत पाणी साचलं आणि डेंग्यूला कारणीभूत असलेल्या डासांसाठी अनुकूल प्रजनन स्थळे निर्माण झाली. हे प्रमाण न थांबल्यास भविष्यात ग्रामीण भागात या रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता नगरगावातील एका ग्रामस्थाने वर्तविली आहे.

सीएचसीचे नोडल अधिकारी डॉ. संकेश फडते यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, डेंग्यू रुग्ण वाढत आहेत. मात्र, आवश्यक त्या उपाययोजना केल्यामुळे हे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यांच्या मते ग्रामीण भागात सरपंच आणि पंच सदस्यांच्या मदतीने फॉगिंग, स्वच्छता मोहीम यांसारखे उपाय केले गेले. आम्ही सर्व पंच सदस्यांच्या बैठका घेतल्या आहेत जेणेकरून ते आपापल्या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात मदत करतील, अशी माहिती डॉ. फडते यांनी दिली.

हेही वाचाः अखेर दिलासा, जामीन मंजूर! राणेंची रात्र जेलमध्ये जाणार नाही तर…

आरोग्य प्राधिकरण झाले सतर्क

डेंग्यू विषाणूबाबत आरोग्य प्राधिकरण हाय अलर्ट आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी उच्च ताप, शरीर दुखणे, पुरळ आणि मळमळ यांसारखी लक्षणे असलेल्या लोकांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रांवर किंवा सीएचसीला भेट देण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक रुग्णालयाची टीम घरोघरी भेट देऊन आजूबाजूची पाहणी करणार असून डासांची पैदास कशी रोखता येईल याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | Bjp | Dabolim | सदानंद शेट तानावडेंचा पत्रकार परिषदेतून खोचक टोला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!