पंचांचा निष्क्रीय कारभार ; साफसफाईसाठी युवकच उतरले रस्त्यावर !

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी
पणजी : पंचांच्या निष्क्रीय कारभारामुळं अखेर युवकांनाच रस्त्याच्या साफसफाईची मोहिम राबवावी लागलीय. वेळसाव पाळे ईसोरसी पंचायतीच्या प्रभाग क्रमांक सातमधील ही घटना आहे. होलांत जंक्शन ते होलांत बीच असा हा रस्ता आरजीच्या युवकांनी स्वत:च साफ केला.
मध्यंतरी झालेलं तौक्ते वादळ आणि त्यानंतर झालेला जोरदार पाऊस, यामुळं या रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडं झुडपं वाढली होती. रस्ता दिसेनासा झाला होता. कामासाठी बाहेर जाणारे या परिसरातले युवक-युवती रात्री अपरात्री येतात. त्यामुळं अशा धोकादायक रस्त्यावरून त्यांना यावं लागतं. यासंदर्भात युवकांनी पंचायतीकडं साफसफाईची मागणी केली, मात्र पंचांनी त्याकडं साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळं आता असले पंच हवेतच कशाला, असा सवाल आता हे युवक विचारातायंत.
स्थानिक पंचांनी याकडं दुर्लक्ष केल्यानंतर अखेर या युवकांनी साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 50 ते 60 युवकांनी आपले कामधंदे बाजुला ठेवून या कामासाठी वेळ काढला. सुमारे दोन किलोमीटर होलांत जंक्शन ते होलांत किनाऱ्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या झुडुपांची आरजीच्या युवकांनी साफ सफाई केली.
तौक्ते चक्री वादळानंतर होलांत येथे मोठया प्रमाणात झाडे पडून मोठे नुकसान झाले. स्थानिक आमदार व पंच येथे पहाणी करून गेले. आश्वासन देऊन गेले परंतु आजपर्यंत काहीच केलं नाही. अश्या लोकांना का म्हणून निवडून द्यावे?
– गौरीश बोरकर
होलांत गावात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील पाईप लाईन फुटली असून स्थानिक पंच पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.
– दिवेश बोरकर