VACCINATION | लस घ्यायला जाताय? मग आधी हे वाचा!

कुटुंब कल्याण ब्युरो तसंच आरोग्य संचालनालयाकडून खास नियमावली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सध्या सुरू असलेल्या कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना राज्य कुटुंब कल्याण ब्युरो तसंच आरोग्य संचालनालयाकडून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेण्याची सूचना करण्यात आलीये. यासाठी शनिवारी एक परिपत्रक जारी करण्यात आलंय.

नक्की काय सांगितलंय परिपत्रकात?

ताप, खोकला किंवा सर्दी यासारखी कोणतीही कोविड-19 ची लक्षणं असलेल्या व्यक्तीने लसीकरणाच्या ठिकाणी जाणं टाळावं. लसीकरणासाठी जाण्यापूर्वी त्या व्यक्तीने स्वतःची कोविड चाचणी करावी.

कोविड-19 ची लागण झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत, लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी कोविडमधून बरं होऊन किमान 90 दिवसांचा कालावधी उलटला पाहिजे, हे लक्षात असू द्यावं.

कोविड प्रतिबंधक लसीचा 1 डोस घेतल्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला, तर कोविडमधून बरं झाल्यानंतर दुसरा डोस घेण्यापूर्वी 90 दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा.

स्त्रियांसाठी, कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण होईस्तोवर गर्भधारणा होणार नाही याची खात्री बाळगा आणि स्तनदा मातांनी प्रसूतीला 45 दिवस उलटून मगच कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, हे लक्षात असू द्या.

रुग्णालयात दाखल करणं किंवा आयसीयूत काळजी घेणं आवश्यक असलेल्या, इतर कोणताही गंभीर-सामान्य आजार असलेल्या व्यक्तींनी कोविड-19 लस घेण्यापूर्वी बरं झाल्यानंतर किंवा डिस्चार्ज मिळाल्यानंतर 4 ते 8 आठवडे प्रतीक्षा करावी.

ज्या कोविड-19 रुग्णांच्या सार्स-2 मोनोक्लोनल अँटिबॉडिज किंवा कॉन्व्हेलेसेंट प्लाझ्मा देण्यात आले आहे, त्याचं कोविड-19 लसीकरण डिस्चार्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांनी पुढे ढकललं जाईल.

ज्यांची इतर औषधं सुरू आहेत किंवा ज्यांचा अॅलर्जीचा इतिहास आहे, त्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आल्यानंतर प्रत्येकाने कोविड नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे. जसं की सामाजिक अंतर राखणं, मास्क वापरणं आणि नियमित हात सॅनिटाइझ करणं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!