मुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…

दोन कारवाईत उत्पादन शुल्कनं गोवा दारूसह जप्त केला 54 लाखांचा मुद्देमाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : एकीकडं मुसळधार पाऊस आणि महापूरानं जनजीवन विस्कळीत केलं असतानाच अशा स्थितीतही अजिबात उसंत न घेता दारू वाहतूक करणारे आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशीच एक मोठी कारवाई भर पावसात करण्यात आलीय. गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने ट्रकमधून होणाऱ्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत तब्बल ३२ लाख ४० हजार रुपये किमतीची गोव्याची दारु जप्त केली आहे. ६०० बॉक्समध्ये तब्बल ७२०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी हरियाणा येथील चालकास ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई इन्सुली तपासणी नाका तसेच रत्नागिरी व कोल्हापूरच्या पथकाने आज कारवाई केली. गोव्यातून कोल्हापूरकडे गोवा बनावटीची दारु वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती इन्सुली उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती.

गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एचआर ५६ ए ६२४३) तपासणीसाठी थांबविण्यात आला. ट्रकमध्ये लाकडी भुसा भरलेल्या पोत्यांच्या खाली दारुचे बॉक्स ठेवलेले निदर्शनास आले. रॉयल ७७ व्हिस्कीच्या ७२०० प्लास्टिकच्या बाटल्या असलेले एकूण ६०० बॉक्स रचून ठेवण्यात आले होते. त्याची किंमत ३२ लाख ४० हजार रुपये आहे. तसेच १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४४ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, आणखी एका कारवाईत पुणे व नगरच्या उत्पादन शुल्क पथकानं नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी शिवाराजवळ गोव्याच्या दारूसह तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!