येत्या 2 महिन्यात तुये सरकारी हॉस्पिटलात कोविड केअर सेंटर सुरू करणार

आमदार दयानंद सोपटेंचं आश्वासन; कोविड केअर सेंटरमध्ये 50 खाटांची व्यवस्था

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी

कोरगावः कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पेडण्यातील तुये सरकारी हॉस्पिटलची नवी इमारत दोन महिन्यांच्या आत 50 खाटांसह तयारी करणार असल्याचं मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितलं. सरकारी अधिकाऱ्यांसह तुये सरकारी हॉस्पिटलच्या नव्या इमारतीची त्यांनी मंगळवारी पहाणी केली. यावेळी ते बोलत होते.

हा व्हिडिओ पहाः Positive मुलाखत | Video | स्वतःच्या फार्म हाऊसचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरच्या कामाची पहाणी

यावेळी आमदार  सोपटेंसोबत तुये सरकारी हॉस्पिटलमधील कोविड विभागासाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल ऑफिसर गुरुदास पिळर्णकर, पेडणे सरकारी हॉस्पिटलच्या आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब, नमिता आजगावकर, सरकारी अभियंता रोहन साळगावकर, अभियंता श्रीकांत पाटील, उपजिल्हाधिकारी रवीशंकर निपाणीकर आणि मामलेदार अनंत मळिक उपस्थित होते.

मदत लागल्यास मला संपर्क करा

जरी रक्ताची नाती नसली, तरी  सर्व लोक हे आमचेच आहेत. कुणालाही कसली कमतरता पडू नये किंवा कुणाची गैरसोय होऊ नये तसंच प्रत्येकाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी हाच सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी कसलाही भेदभाव करणार नाही. तुये सरकारी हॉस्पिटलमधील कोविड केंद्र सुरू करण्यात कसली समस्या निर्माण होत असल्यास किंवा आर्थिक प्रश्न निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांशी बोलून अशा समस्या सोडवल्या जातील. तसंच पेडणे तालुक्यातील जनतेला अशा परिस्थितीत धावपळ करावी लागणार नाही, असं सोपटे म्हणाले.

खबरदारी घेणं महत्त्वाचं

कोरोनाची तिसरी लाट प्रामुख्याने मुलांसाठी घातक आहे. कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा कोरोना होऊ नये म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे. म्हणूनच येत्या दोन महिन्यांच्या आत हे तुये सरकारी हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरचं काम पूर्ण करणार. यापूर्वीच पेडण्यात सुरू केलेल्या कोविड उपचार केंद्रात आवश्यक डॉक्टर, अन्य कर्मचारी, ऑक्सिजन अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, हे चांगलं लक्षण आहे, असं सोपटे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!