गोव्यापेक्षा जास्त लोकसंख्या असूनही मुंबईत कोरोना कंट्रोलमध्ये!

मुंबईतील रुग्णवाढ गोव्यापेक्षाही कमी!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोनाचे दैनंदिन आकडे घाबरवणारे असल्याचंच चित्र गोव्यात पाहायला मिळतंय. दरम्यान, सुरुवातीपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या मॉडेलची चर्चा जोर धरतेय. विशेष करुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईतील कोरोना स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळतंय. महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या जास्त असूनही मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचं आकडेवारी सांगतेय. त्यामुळे मुंबईचं कौतुक होणं, ही बाबही ओघाओघानं आलीच.

गुरुवारी बीएमसीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गोव्यापेक्षा मुंबईत कोरोना रुग्णवाढ कमी नोंदवली गेली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही गोव्यापेक्षा खूप जास्त आहे. मृत्यूदराची चिंता मुंबईत अजूनही कायम असली तरी मुंबईत गुरुवारी नोंदवण्यात आलेले मृत्यू हे गोव्यापेक्षा कमीच आहेत.

हेही वाचा : TOP 20 | ONE LINERS | महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर

मुंबईचे आकडे काय सांगतात?

गुरुवारी बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत कोरोनाचे नवे १ हजार २६६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ८५५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सक्रिय रुग्णसंख्या मुंबईत गोव्यापेक्षा जास्त आहे. मुंबईत सध्याच्या घडीला २८ हजार ३१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र मुंबईचा रिकव्हरी रेट हा गोव्यापेक्षा खूप जास्त आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

Corona

हेही वाचा : ‘कुंभमेळ्यामुळे कोरोना देशभर पसरला, असं पसरवून लांच्छन लावणे, हे महापापच!’

मुंबई गोव्यापेक्षा सुरक्षित!

लोकसंख्या आणि घनतेच्या मानाने मुंबईतील परिस्थिती गोव्यापेक्षा बिकट आहे. दाटीवाटीचं शहर, सततची गर्दी यामुळे मुंबईत संसर्ग वाढण्याची भीतीही जास्त आहे. दुसरीकडे गोव्यात फारशी गर्दी होण्यासारखी ठिकाणी मुंबई इतकी नाहीत. तसंच मुंबईची लोकसंख्या ही १ कोटी २० लाखापेक्षा जास्त आहे. तर गोव्याची लोकसंख्या जेमतेम २० लाखाच्या आसपास आहे. अशाही परिस्थितीत गोव्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ही फारच दिलासादायक बाब मानली जाते आहे.

अशातच महिन्याभरापूर्वीही मुंबईत कोरोनाची स्थिती कशी होती, याचा अनुभव एबीपी माझाचे पत्रकार विठोबा सावंत यांनी फेसबुकवरुन शेअर केला आहे. ते लिहितात की…

कोरोना पॉझिटिव्ह आलो होतो त्याला आज महिना झाला. त्या संकटातून आता सुखरूप बाहेर आलो आणि पुन्हा रुटीन सुरू झालं….. आज महिनाभरानं तो अनुभव लिहितोय.
जेव्हा देशभरात ऑक्सिजनसाठी तडफड सुरू होती, रेमडेसिवीरचा काळाबाजार होता, लोकांना बेड मिळत नव्हते, कोरोनाची दुसरी लाट जोरात होती, तेव्हाच म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबाला कोरोनानं गाठलं. त्यानंतरचा काळ आशानिराशेनं भरलेला, अनेक चांगले-वाईट अनुभव देणारा, किंबहुना अधिक चांगले‌ अनुभव देणारा आणि पदोपदी माणुसकीचं दर्शन घडवणारा होता…..

सोशल मीडियात, मीडियात जे अनुभवतो, त्याचा‌ अनुभव या काळात थोडाफार आला. पण त्यापलिकडे कोरोना संकटाचा अनुभवही वेगळा होता…. मुंबई मॉडेल काय‌ आहे? यावेळी कोण मदतीला येतं, यंत्रणा कशी राबते हे या काळात कळलं…..


आधी पत्नीला, मग मला आणि त्यानंतर आईला ताप आला. फॅमिली डॉक्टर्सनी दिलेल्या‌ औषधांनी ताप ओसरला. अंग मोडून आलं. दोन दिवसांनी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अँटीजेन चाचणी केली आणि मी, पत्नी दोघंही पॉझिटिव्ह आलो आणि आई निगेटिव्ह. घरातील चार सदस्यांना क्वारंटाईन व्हावं लागणार होतं. डॉक्टरांशी बोललो. ट्रॉमा केअर सेंटरमधूनही औषधं दिली गेली. मग माझे मित्र शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सुनील म्हसकर यांना फोन केला. सुनील हे नाव अशासाठी‌ डोळ्यासमोर आलं कारण गेले सव्वा वर्षे या भागात कुणीही कोरोनाबाधित झालं तर त्याला अँम्ब्युलन्स मिळवून क्वारंटाईन सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडणं आणि सुखरूप झाल्यावर घरी परत आणणं, दरम्यानच्या काळात घर, इमारत सॅनिटाईज करणं हे काम सुनील करत असल्याचं मी पाहात होतो. त्या बद्दल ना कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा, सोशल मीडियात ना कुठे एका ओळीचा उल्लेख…..


सगळ्यांचं आधारकार्ड, रिपोर्ट दे. विलेपार्ल्यातील हॉटेलमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था करुयात, असं‌ सुनीलनं सांगितलं आणि नगरसेवक बाळा नर यांच्याशी बोलून पार्ल्यातील जेनेसिस हॉटेलमध्ये जाण्यास सांगितलं.


पण तिथे गेल्यावर एक अडचण झाली. आम्ही पॉझिटिव्ह असल्यानं आम्हाला प्रवेश‌ मिळाला, पण आईचा रिपोर्ट आलाच नव्हता. तिला भरपूर ताप होता. बरोबर माझी छोटी मुलगी. शेवटी त्या दोघी घरी आल्या. मुलगी रात्रभर आजीचा ताप मोजत होती आणि फोन करून माहिती कळवत होती. सगळा अस्वस्थ‌ करणारा अनुभव होता…..


दुसऱ्या दिवशी आईचा रिपोर्ट आणायला कोण जाणार हा प्रश्न होता. पण सुनील‌ म्हणाला, काळजी करू नको, मी‌ हॉस्पिटलला जाऊन घेऊन येतो. संध्याकाळी सुनील तिथं‌ गेला, त्यालाही तिथं स्टाफनं हेलपाटे मारायला‌‌ लावले. शेवटी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं.


….तरीही आईला कोरोनाची लक्षणं दिसत‌ होती. खाजगी डॉक्टरांनी ब्लड टेस्ट, सिटीस्कॅन करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी बहीण विरारहून आली. तिनं धावपळ करून सगळं‌‌ केलं. आणि दुपारी महापालिकेतून फोन आला, आई पॉझिटिव्ह आहे. हा एका अर्थानं धक्का होता, पण उपचारांचा मार्गही मोकळा झाला होता……


बहीण रिपोर्ट आणायला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेली. तिथल्या स्टाफनं त्यासाठी तिला तीन मजले फिरायला लावलं.‌ शेवटी रिपोर्ट दिला. मुंबई महापालिकेचे लाखो कर्मचारी या संकटात चांगलं काम करतायत. पण असे काही हाताच्या ‌बोटावर‌ मोजण्याएवढे बेफिकीर कर्मचारी त्यांच्या‌ चांगल्या कामाला काळिमा फासतात. वास्तविक‌ रिपोर्ट कुठे मिळेल याची माहिती देणे साधंसोपं काम आहे. पण त्यासाठी‌ मनःस्ताप देणाऱ्यांचं महापालिकेनं समुपदेशन करायला हवं.


….या कठीण काळातही आईला हॉस्पिटलमध्ये‌ सहज‌ प्रवेश मिळाला. गावी असलेला भाऊ समीरनं माजी नगरसेवक शैलेश‌ परब यांना फोन केला. त्यांचा‌ मला फोन आला, माजी नगरसेवक प्रमोद सावंत यांना डिटेल्स पाठवा, ते‌ मदत करतील. मंत्री अनिल परब आमचे गाववाले. त्यांनाही एक मेसेज टाकला. त्यांचे सहकारी सुनील शेट्टींचा फोन आला. आधार्डकार्ड, रिपोर्ट पाठवा म्हणाले. बहीण आईला घेऊन सेव्हनहिल्स हॉस्पिटलला गेली. प्रमोद‌ सावंत यांनी त्यांचा एक सहकारी पाठवला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर उपचारही सुरू झाले……


वर उल्लेख केलेल्या‌‌ व्यक्ती एरवी कॅमेऱ्यासमोर नसतात, ना त्यांच्या‌ कामाची प्रसिद्धी होत. पण जेव्हा गरज असते तेव्हा हक्कानं उभी राहणारी ही माणसं. ती वेगळीच असतात. आज आदित्य ठाकरे सोशल मीडियावर अपडेट‌ असतात. शिवसेनेचं ते नवं रूप आहे. पण या‌ मुंबईत ट्विटर, फेसबुकच्या पलिकडे मोठा‌ वर्ग आहे. इथल्या गल्लीबोळातल्या सामान्य‌‌ माणसांशी, त्यांच्या‌ अडीअडचणींशी, सुखदुःखाशी गेली अनेक दशकं समरस झालेलं, ऋणानुबंध असलेलं हे एक मॉडेल आहे. बाळासाहेब ठाकरेंचं‌‌ मॉडेल. ते कायम अॅक्टिव्ह मोडवरच‌ असतं. मुंबईत सगळ्या‌ पक्षात कमी-अ़धिक प्रमाणात असे कार्यकर्ते आहेत. वर्षानुवर्षे ते असंच काम करत असतात….. शिवसेनेत ते अधिक रुजलंय……


त्यानंतर ज्याची‌ चर्चा सगळीकडे सुरू आहे त्या‌ बीएमसीच्या‌ मुंबई मॉडेलचा अनुभव सुखावणारा, कौतुक करावं‌ तेवढं‌ कमी‌ होईल असा होता. आई एकटीच ‌रुग्णालयात‌ होती, पण तिच्या तब्येतीत तातडीने सुधारणा होऊ लागली होती. डॉक्टर फोन करून रोज माहिती देत‌‌ होते……


आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये होतो. तिथली व्यवस्थाही‌ चांगली होती. तिथंही पत्नीच्या‌‌ मैत्रिणीनं काय‌ हवं असेल ते पाठवलं. मित्र नितीन डिचोलकर मदतीला आले. डॉक्टर्स सल्ला देत‌ होते. बरंही वाटत‌ होतं.


पण दोन दिवस झाले आणि धक्कादायक प्रकार घडला. माझा रक्तदाब कमी झाला आणि काही वेळ बेशुद्ध झालो. घाबरायला झालं. तेव्हाच संपादक राजीव खांडेकर सरांचा फोन आला. हॉस्पिटलला अॅडमिट हो म्हणाले. माझा संपादक मित्र संजय सावंतचा फोन आला. तो आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख महेश‌ नार्वेकरांशी बोलला. व्यवस्था झाली आणि मी देखिल सेव्हन हिल्स रुग्णालयात‌ दाखल‌ झालो…. आयुष्यात पहिल्यांदाच‌ मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो……


दाखल करून घेताच‌ तातडीनं रक्ताचे नमुने घेतले गेले. दुसऱ्या दिवशी सिटीस्कॅन केला. आणि संध्याकाळी रेमडेसिवीरही सुरू केली. औषधोपचार सुरू झाले आणि प्रकृतीत सुधारणाही दिसू लागली. त्याच काळात सोशल मीडियावरच्या‌ बातम्या पाहून मन चर्रर्र होई. रोहित‌ सरदाना गेल्याची‌ बातमी तेव्हाच‌ आली. ओळखीपाळखीतलं कुणी ना कुणी गंभीर असल्याचं‌, गेल्याचं‌ वाचून धक्का बसे. सगळा आशानिराशेचा खेळ होता….. यावेळी मित्रांचा आधार महत्वाचा ठरतो. शेजारी, मित्र अशावेळी मदतीला येतात हा अनुभव या‌ संकटानंही दिला. अनेक मित्रांची नावं सांगता येतील, पण ते त्यांनाही आवडणार नाही.


मुंबई मॉडेलचा अनुभव


पण या काळात मुंबई महापालिकेच्या शिस्तबद्ध, अनुभवी, व्यावसायिक, कार्यक्षम यंत्रणेचं घडलेलं दर्शन न विसरता येणारं आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर महापालिकेचं कौतुक होत होतं, तेव्हा‌ मी प्रत्यक्ष मुंबई मॉडेलचा अनुभव घेत होतो.‌ त्यांनी कित्येकदा रक्ताचे नमुने घेतले, एक्सरे काढले, वेळच्यावेळी औषधोपचार, तपासणी केली. या सगळ्याची‌ रोज‌ घरी फोन करून डॉक्टर‌ माहिती‌ देत‌ होते. आई आणि माझी एकाच‌ वॉर्डमधील एकाच रुममध्येही त्यांनी व्यवस़्था केली. हॉस्पिटलच्या खोलीची रोज साफसफाई असो, कपडे, बेडशिट, टॉवेल रोजच्या रोज बदलणे असो किंवा वेळच्यावेळी जेवण, नास्ता‌, गोळ्या, तपासणी आणि अन्य‌‌ सुविधा….. महापालिकेच्या व्यवस्थेला तोड नाही. बरं हे सगळं मोफत आहे. रेमडेसिवीरसारखं‌ इंजेक्शन मिळवण्यासाठी लोकांनी‌ वणवण केली, पण केवळ‌ मुंबई महापालिकेमुळे आमच्या‌ वाट्याला असा प्रकार आला नाही. डॉक्टर हर्षल जाधव आणि डॉक्टर प्रतिभा या दोघांचा उल्लेख करावाच लागेल. किती काळजीनं ते रुग्णांवर उपचार करत होते! रुग्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत सगळेजण काळजी घेतात. वॉररुममधून फोन येई, तब्येतीची विचारपूस रोजच केली गेली. कोणतीही गोष्ट‌ हवी असेल तर कर्मचारी क्षणात हजर होई. मुंबई महापालिकेचं‌ कौतुक उगाच‌ होत नव्हतं. रुग्णालयात साफसफाई करणाऱ्या‌ कर्मचाऱ्यांपासून ते नर्स, डॉक्टर्स, अतिरिक्त आयुक्त काकाणी ते आयुक्त‌ चहल यांच्यापर्यंत सगळ्यांचंच हे यश आहे. कसोटीच्या‌ क्षणी रात्रंदिवस लाखो कर्मचारी त्यासाठी राबतायत. लाखो मुंबईकरांचे जीव वाचवतायत….. मुंबई महापालिकेची मोठी यंत्रणा हाताळण्याची आजवरची पुण्याई आणि अनुभव त्यांच्याबरोबर आहेच, पण लाखो कर्मचारी सेवाभावानं करत असलेल्या‌ कामाचं मोल खूप मोठं आहे. एखादी चूक झाली तर ती समोर आणून सुधारायला हवी. पण सेव्हन हिल्समध्ये मला तसा अनुभव आला नाही. या कामासाठी मुंबई महापालिकेचं कोणत्या संघटना, यंत्रणा कौतुक करोत अथवा न करोत. पण त्यांची सेवा घेऊन गेलेल्या‌ प्रत्येक रुग्णाची भावना ही महापालिकेच्या‌ कामाची पावती आहे. मुंबई महापालिकेनं‌ कष्टानं मिळवलेला हा लौकीक कायम‌ राखण्यात त्यांना यश‌ मिळो! मुंबई महापालिकेचे ‌पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!!

गोव्याची 27 मेची आकडेवारी काय?

नवे रुग्ण – 1504
बरे झाले – 1557
मृत्यू- 39

हेही वाचा : 19 वर्षाच्या तरुणासह सलग तिसऱ्या दिवशी राज्यात 39 कोरोना बळी!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!