रुग्णवाढीला ब्रेक, रिकव्हरी रेटमध्ये सुधार! पण एकूण मृत्यू २७००च्या पार

सक्रिय रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णवाढ घटली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. दैनंदिन आकडेवारीत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त केला जातो आहे. तसंच आरोग्य यंत्रणेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. मात्र या सगळ्यात कोरोनामुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण अजूनही आटोक्यात आल्याचं पाहायला मिळालेलं नाही. कारण गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा १७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आता एकूण कोरोना बळींचा आकडा हा २ हजार ७००च्या पार गेलाय.

corona-1-1

नेमकी आकडेवारी?

राज्यात गुरुवारी ५७२ नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालंय. ज्यापैकी ४८२ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर ९० कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तिप्पट रुग्ण हे कोरोनातून बरे झाल्याची नोंद गुरुवारी करण्यात आली आहे. एकूण १ हजार ६९७ कोरोना रुग्ण बरे झाले आहे. त्यापैकी ९८ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आलाय.

किती चाचण्या केल्या?

गुरुवारी आरोग्य खात्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण ३ हजार ३३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्यांच्या तुलनेत आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या पाहिली तर राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा आटोक्यात येत असल्याचं दिसून आलंय. सध्या पॉझिटिव्हिटी रेट हा १७.१७ टक्के नोंदवला गेलाय. तर रिकव्हरी रेट हा ९२.१४ टक्क्यांवर पोहोचलाय. दरम्यान, सध्याच्या घडीला एकूण ९ हजार ७०० सक्रिय रुग्ण राज्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

coronavirus-test-1606815937

मृत्यू २७००च्या पार

मे महिन्यात झालेल्या मृत्यूच्या तांडवानंतर आता जून महिन्यात दैनंदिन मृत्यूंचं प्रमाण कमी झालंय. मात्र हे प्रमाण पूर्णपणे आटोक्यात आलेलं नाही. गेल्या २४ तासांत एकूण १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ही २ हजार ७१०वर पोहोचली आहे. मे महिन्यापासून सुरु झालेलं कोरोना बळींचं सत्र हे अजूनही आटोक्यात येत नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, गुरुवारपासून पुन्हा एकदा कोरोना लसीकरणाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. कारण गुरुवारपासून १८ ते ४४ वयोगटाप्रमाणेत ठरवून दिलेल्या विशेष गटाला लसीकरणात प्राधान्य देण्यात आलं आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य यंत्रणेपुढे लसीकरणाचं लक्ष्य गाठणं, हे आव्हानात्मक असणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!