डिजिटल मीटरवर सोमवारी हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी

‘टीटीएजी’कडून खंडपीठात दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील पर्यटक टॅक्सींना १ ऑगस्ट २०१९ पासून डिजिटल मीटर, पॅनिक बटण, जीपीएस यासारख्या यंत्रणा लागू कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला होता. सरकारने या आदेशाचे पालन केलं नसल्याने ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) यांनी खंडपीठात दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सोमवारी सुनावणी होणार आहे.

हेही वाचाः टॅक्सीवाल्यांचा ‘बाप्पा’ अटकेत!

२०१६ साली गोवा खंडपीठात मूळ याचिका दाखल

राज्यात पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर, जीपीएस यंत्रणा लागू करण्याबाबत ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) या संघटनेने २०१६ साली गोवा खंडपीठात मूळ याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाहतूक खात्याने १ ऑगस्ट २०१९ पासून याची कार्यवाही करण्याची ग्वाही खंडपीठाला दिली होती. त्यानंतर ५ जुलै २०१९ रोजी खंडपीठाने टीटीएजीची याचिका निकालात काढली. त्यावेळी खात्याने राज्य सरकार १६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत राज्यात प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा लागू करणार असल्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने स्वत:च खंडपीठात अर्ज दाखल करून दोन महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती. ही मुदत उलटून गेली तरी सरकारने त्यावर काहीच अंमलबजावणी केलेली नव्हती. त्यानंतर टीटीएजीने पहिल्यांदा अवमान याचिका दाखल केली.  त्यावेळी रॉसमर्त ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खंडपीठात मूळ याचिकेत हस्तक्षेप याचिका दाखल करून राज्यात डिजिटल मीटर, पॅनिक बटण, जीपीएस यांसारख्या यंत्रणा लागू करण्यासंबंधी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत खंडपीठाला माहिती देऊन मदत करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होतं.

हेही वाचाः ‘अपना भाडा’चे लोकार्पण; दोन दिवसांत टॅक्सी सेवा सुरू

सोमवारी सुनावणी

त्यानंतर सरकारने प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा लागू केलेल्या यंत्रणेचा चांगला प्रतिसाद असल्याचे खंडपीठात सांगितलं. तसंच १५ दिवसात टॅक्सी मीटर दर अधिसुचित करण्यात येणार असल्याची माहिती खंडपीठात सादर केली. याची दखल घेऊन खंडपीठाने २० जानेवारी २०२० रोजी पहिली अवमान याचिका निकालात काढली. परंतु असं असताना मागील अनेक महिने काहीच झालं नसल्यानं टीटीएजीने २५ जानेवारी २०२१ रोजी सरकारला नोटीस बजावून खंडपीठाच्या २० जानेवारी २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार, पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर, जीपीएस यंत्रणा बसवण्याची मागणी केली. असं असतांना यात काहीच केलं नसल्यानं टीटीएजीने खंडपीठात दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!