हिंमत असेल तर चौकशी करा : प्रसाद गावकरांचं आव्हान

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : सांगेत आयआयटीसाठी मी तीन जागा सरकारला सुचवल्या होत्या. रिवण येथील जागा आयआयटीसाठी अगदी योग्य होती. मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या आजारामुळे तो प्रश्न मागे पडला. त्यानंतरच्या सावंत सरकारने त्या विषयी काहीच पाठपुरवठा केला नसल्याचा आरोप सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकरांनी केला.
हिंमत असेल, तर चौकशी करा
आयआयटीच्या प्रश्नाने आता वेगळेच वळण घेतले आहे. सांगेचे आमदार प्रसाद गावकर हे आयआयटीच्या जमिनीसाठी सेंटिंग करत होते, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर आमदार प्रसाद गावकरांनी जोरदार प्रत्युत्तर देत, हिंमत असेल तर माझी चौकशी कराच, असे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
प्रसाद गावकरांनी काढला भाजपचा पाठिंबा
सांगेचे आमदार प्रसाद गावकरांनी भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढला. तसे पत्र त्यांनी राज्यपलांना दिले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांमुळे आपण भाजपला पाठिंबा दिला होता. आता भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केलाय. भाजपला माझ्या पाठिंब्याची आता गरज नाही, अशी बोचरी टीका गावकरांनी केली. पाठिंबा मागे घेत असल्याचे पत्र त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना दाखवल्यानंतर त्यांनी राज्यपालांना ते पत्र सुपूर्द केले.
गावकरांची सावंतांवर तिखट शब्दांत टीका, म्हणाले…
प्रसाद गावकर, आमदार
मुख्यमंत्री प्रमोद सावंतांवर ते प्रॉपर्टी सावंत असल्याचे आरोप होत होते. मी आजपर्यंत या विषयी काही बोललो नाहीये. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांवर होणारे आरोप हे खरे आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रॉपर्टी सावंतच आहेत.
दामू, तवडकर भाजपाचे स्क्रॅप मटेरियल
मुख्यमंत्र्यांनी प्रसाद गावकरांवर सेटिंगचे आरोप केल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी भाजपचे दामू नाईक आणि रमेश तवडकर यांनीही प्रसाद गावकरांवर टीका केली होती. त्यावर दामू नाईक आणि रमेश तवडकर हे भाजपाचे स्क्रॅप मटेरियल असल्याची टीका प्रसाद गावकरांनी केली. दामू नाईक यांनी फातोर्डा मतदारसंघात काय विकास केला, हे आधी सांगावे. दामूंना आयआयटीबद्दल काहीच माहिती नसल्याचेही आमदार प्रसाद गावकर म्हणाले.