इफ्फी होणार प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमात!

आयोजनात खंड न पडण्याचा सुकाणू समितीचा निर्धार. गोवा मनोरंजन संस्था लवकरच इफ्फीच्या कामाला सुरुवात करण्याची शक्यता.

यश सावर्डेकर | प्रतिनिधी

पणजी : 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 16 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत होणार आहे. या वर्षीचा इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने दिली.

यंदा इफ्फी काही प्रमाणात व्हर्च्युअल तसेच प्रत्यक्ष ठिकाणांवर होणार असून महोत्सवात 7 अधिकृत विभाग असतील. इफ्फीच्या निमित्ताने पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे इफ्फीचे आयोजन पर्यटनवृध्धीच्या नजरेतून महत्वपूर्ण ठरणार आहे.

यावर्षीचा फिल्म बझारही आभासी तसेच प्रत्यक्ष पद्धतीने होईल. इफ्फी संदर्भात सुकाणू समितीची प्रथम व्हर्च्युअल बैठक ऑगस्ट महिन्यात झाली. या बैठकीत इफ्फीचे आयोजन करावे की नाही, यावर चर्चा झाली होती. इफ्फीच्या आयोजनात खंड पडू नये आणि आयोजन व्हावे, परंतु ते मर्यादित प्रमाणात व्हावे अशी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर, गोवा मनोरंजन संस्था लवकरच इफ्फीच्या कामाची लगबग सुरू करेल.

दरम्यान, इफ्फीत कोणते देश, प्रतिनिधी सहभागी होतील, इफ्फीचा उद्‍घाटन व समारोप सोहळा या संदर्भातील माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

‘फिल्म बझार’ही आभासी पद्धतीने
हे वर्ष फिल्म बझारचे 14 वे वर्ष असणार आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या सहसचिव टी.सी.ए कल्याणी यांनी राष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या महामारीमुळे ज्याप्रमाणे इफ्फी पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फिल्म बझारही इफ्फीसोबत पार पडणार आहे. यापूर्वी आम्ही आभासी पद्धतीने करण्याचे ठरविले होते. मात्र आता इफ्फी सोबतच आभासी आणि प्रत्यक्ष असा दोन्ही पद्धतीने फिल्म बझार होणार आहे. आभासी पद्धतीने फिल्म बझार होणार असल्याने यावर्षी जागतिक सिनेप्रेमी आणि ज्यांना चित्रपट निर्मितीमध्ये अधिक आवड आहे, अशा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!