इफ्फीत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात 51व्या इफ्फीत (IFFI) चित्रपट रसिकांना आंतरराष्ट्रीय, आशियाई आणि भारतीय विभागांतर्गत दर्जेदार नवीन चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ही घोषणा केली.
16 ते 24 जानेवारी या दरम्यान हा महोत्सव गोव्यात होईल. यापूर्वी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा नऊ दिवसीय चित्रपट उत्सव होणार होता. मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला होता.
जावडेकर ट्विटरवर म्हणाले, भारतीय पॅनोरमा विभागात 47 चित्रपट, फिचर विभागात 26 आणि नॉन फीचर विभागात 21 चित्रपट असतील. एकूण 224 चित्रपट विविध विभागात दाखवले जातील. हा फिल्मोत्सव आभासी आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात असेल.
कोविडसंबंधित सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे होईल, असे ते म्हणाले.