‘इन टू द डार्कनेस’ चित्रपटाला ‘सुवर्ण मयुर’

‘वाईफ ऑफ स्पाय’ने महोत्सवाचा समारोप : विश्वजीत चटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ५१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘सुवर्ण मयुर’ पुरस्कार डेन्मार्कच्या ‘इन टू द डार्कनेस’ चित्रपटाला प्राप्त झाला. रोख ४० लाख रुपये आणि सुवर्ण मयुर असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत चटर्जी यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘वाईफ ऑफ स्पाय’ चित्रपटाने रविवारी महोत्सवाचा समारोप झाला.

मान्यवरांच्या उपस्थितीत इफ्फीचा समारोप

ताळगावच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसिद्धी मंत्रालयाचे सचिव अमित खरे, सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोण काय म्हणालं…

गोवा हे सुप्रसिद्ध चित्रीकरण स्थळ व्हावं. चित्रिकरणासाठी गोवा सरकारचे नेहमीच सहकार्य राहील, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं. राज्यात पर्यावरणीय पर्यटनालाही प्रतिसाद मिळेल. येत्या फेब्रुवारीत राज्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. चित्रपटामुळे संपूर्ण देशच नाही तर शेजारील देशही एकत्र येतात. प्रत्येक महोत्सवातून काही ना काही शिकायला मिळते, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. चित्रपट हे आपल्याला शिकवतात, जीवनात प्रकाश आणतात, असं केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सांगितलं.चित्रपट महोत्सव झाला ही आनंदाची गोष्ट आहे. चित्रपटांची जादू कायम आहे, असं प्रमुख पाहुण्या आणि अभिनेत्री झीनत अमान यांनी सांगितलं. या सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

सत्कार आणि पुरस्कार

या समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण झालं. इफ्फीची फोकस कंट्री असलेल्या बांगलादेशातही मला पुरस्कार मिळाला आहे, असं अभिनेते विश्वजीत चटर्जी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितलं. विशेष अतिथी या नात्याने उपस्थित असलेले अभिनेते रवी किशन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेनुसार हा महोत्सव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपण सुरक्षित आहोत, असं रवी किशन म्हणाले.

म्हणून इफ्फीचं आयोजन शक्य

या सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव अमित खरे यांनी स्वागतपर भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा सरकार यांच्या पाठिंब्यामुळे कोविड महामारीच्या काळातही इफ्फी आयोजित करणं शक्य झाल्याचं सांगितलं. नियोजन आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे इफ्फीचं यशस्वी आयोजन शक्य झालं, असं मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांनी सांगितलं. महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी आभार मानले. सोहळ्यात मनोरंजनात्मक संगीत आणि नृत्याचे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले.

‘को चेन नियेन’ ठरले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयुर पुरस्कार ‘द सायलेंट फॉरेस्ट’चे दिग्दर्शक को चेन नियेन यांना प्राप्त झाला. रोख १५ लाख आणि रौप्य मयुर, असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुशॉन लिओ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जोफिया ट्रेनेस यांना रौप्य मयुर पुरस्कार मिळाला. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. विशेष परीक्षक मंडळाचा पुरस्कार ‘फेब्रुवारी’ चित्रपटाचे दिग्दर्शक कॅमन केली यांना मिळाला. ‘द ब्रिज’ चित्रपटाचे दिग्दर्शक कृपाल कलिता यांना रौप्य मयुर पुरस्कार मिळाला. पदार्पणातील चित्रपटासाठीचा पुरस्कार ‘वेलेंटिन’चे दिग्दर्शक कॅशिओ परेरा दोस सांतोस यांना मिळाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!