हिंमत असेल तर पर्रीकरांनी आरोप केलेल्या खाण घोटाळ्याचा तपशील उघड करा !

कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

Goan Varta Live | प्रतिनिधी

नुवे/मडगाव : भाजपचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी सन २०१२ मध्ये केवळ सत्ता काबीज करण्यासाठी तथाकथित ३५००० कोटींच्या खाण घोटाळ्याचा आरोप केला होता. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंमत असल्यास सदर आरोपाचा तपशील लोकांसमोर ठेवावा व आजपर्यंत सरकारने त्यातील किती रक्कम वसुल केली हे जाहिर करावे. या तथाकथित खाण घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले हे पण जनतेसमोर ठेवावे, असे उघड आव्हान कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिलंय.

आज नुवे येथे समाज कार्यकर्ते जोस राजू काब्राल यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री व भाजपवर हल्ला चढविला व त्यांनी लोकांची दिशाभूल करणे बंद करावे, असं सुनावलं.

यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, कॉंग्रेसचे सदस्य नोंदणी समन्वयक राजेश ग्रिगलानी, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, गट अध्यक्ष मान्युएल डिकोस्टा, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख व संकल्प आमोणकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, जिल्हा पंचायत सदस्य आकुसीना रॉड्रिगीस, झरिना डिकून्हा, मारियान रॉड्रिगीस, डॉ. आशिश कामत व इतर हजर होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खाण व्यवसायावर बोलण्याचा नैतीक अधिकार नसुन, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २०१२ मध्ये गोव्यातील खाण व्यवसाय मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठीच त्यावेळी तडकाफडकी खाणी बंद केल्या, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

भाजप सरकारने हिंमत असल्यास सदर ३५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा तपशील जाहिर करावा तसेच स्व. पर्रीकरांनी उल्लेख केलेला लेखा समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.

जोस राजू काब्राल यांच्यासारखेच अनेक युवक आता कॉंग्रेस पक्षात सामिल होत असुन, त्यामुळे कॉंग्रेस पक्ष बळकट होत आहे. कॉंग्रेस पक्षाचे दरवाजे दहा पक्षांतर केलेल्या आमदारांसाठी कायमचे बंद झाल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

भाजपने गोवा राज्याला दिवाळखोर केले असुन, निवडणूकांच्या वेळेला दिलेले एकही वचन भाजपने पाळलेले नाही. कॉंग्रेस सरकारने २०११ मध्ये प्रत्येक पंचायतीकडे नेलेल्या इंटरनेट सेवेचा भाजपने मागील नऊ वर्षात का विस्तार केला नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असा सवाल दिगंबर कामत यांनी केला.

समाज कार्यकर्ते जोस राजू काब्राल यांनी यावेळी आपण नुवेच्या लोकांचा आवाज बनुन कार्य करणार असल्याचे सांगितले व आगामी विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचाच उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी मंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी राजू काब्राल यांचे स्वागत करताना नुवेत कॉंग्रेस पक्ष आता अधिक बळकट होणार असल्याचे सांगितले.

कॉंग्रेस पक्षाने आता आपला जनसपर्क वाढवला असुन, आम्ही प्रत्येक युवकाकडे संपर्क वाढवत आहोत. युवकांचे प्रश्न सोडवणे व त्यांना रोजगार देणे यासाठी आमचा पक्ष बंधनकारक असल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले.

महिला अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जिल्हा पंचायत सदस्य आकुसीना रॉड्रिगीस व इतरांची यावेळी भाषणे झाली. गट अध्यक्ष मान्युएल डिकॉस्ता यांनी स्वागत केले.

दरम्यान, आज डिजीटल माध्यमांतुन शेकडो लोकांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!