बलात्कार झाला, तेव्हा मी गोव्यात नव्हतो!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : एका २० वर्षीय मॉडेलला ड्रग्ज पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील संशयित २०२० पासून गोव्यात आला नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय आपल्या विरोधकांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचून खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा करून संशयित अनंत छमनलाल तन्ना जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी (दि. ६) होणार आहे.
१६ डिसेंबर रोजी मानवी तस्करी विभागात तक्रार दाखल
या प्रकरणी पीडित मॉडेलने मानवी तस्करी विभागात बुधवार, दि. १६ रोजी तक्रार दाखल केली होती. संशयित अनंत छमनलाल तन्ना यानी गुजरात येथे पीडितेशी मैत्री केली. तिला व्यवसायात भागीदारी देण्याच्या नावाखाली नोव्हेंबर २०२१ मध्ये गोव्यात बोलावून घेतले. गोव्यात तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मोबाईलवर व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करून तिची मानवी तस्करी केली. संशयिताच्या चार मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला.
हेही वाचाः‘मोपा’ला भाऊसाहेब बांदोडकरांचेच नाव योग्य!
संशयिताला २२ रोजी अटक
मानवी तस्करी विभागाने संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम ३७०, ३७०(ए), ३७६, ३७७, ५०६(२), ३२४ आणि मानवी तस्करी विरोधी कायद्याचे कलम ४, ५, ६ व ७ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ ई अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन संशयिताला २२ रोजी अटक केली होती. त्यानंतर संशयिताला न्यायालयाने १४ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर न्यायालयाने सोमवारी संशयिताला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
तेव्हा मी गोव्यात नव्हतो!
दरम्यान संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये तो कुटुंबीयांसह गोव्यात आला होता. त्यानंतर तो गोव्यात आला नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय त्याने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी आठ व्यक्तिविरोधात षडयंत्र रचून खंडणी मागणी केल्याची तक्रार गुजरात येथील कच्छ-भुज जिल्हातील भुज पोलीस स्थानकात केली आहेत. त्यानुसार, आठ व्यक्तींनी १ जुलै ते १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दरम्यान खंडणी मागितल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, तेथील पोलिसांनी आठ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचून आपल्या विरोधात खोटी तक्रार केल्याचा दावा संशयित तन्ना यांनी केला आहे.