मी बाबू आजगावकरांचा समर्थक नाही

‘मिशन फॉर लोकल’च्या राजन कोरगावकरांचा स्पष्टोक्ती

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः आम्ही पेडणेकर स्वाभिमानी आहोत. कुणाच्या मायाजालात फसणारे नाहीत. कुणी कुणाला मदत केली म्हणजे तो त्याच्या ऋणात आयुष्यभर राहात नाही. मदत करणाऱ्याकडे स्वार्थ नसाव, तर सामाजिक बांधिलकीने एखाद्याने मदत करावी. मी सध्यातरी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा आमदार मंत्र्यांचा समर्थक नाही. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचा तर नाहीच नाही. अशी स्पष्टोक्ती कोरगाव येथील ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांनी केली.

हेही वाचाः वेदांताकडून जीएमसीत 100 अद्ययावत बेड्सचं वितरण

राजन कोरगावकरांना बाबू आजगावकरांनी पाठवलंय

कोरगावचे भूमिपुत्र राजन कोरगावकर आपल्या ‘मिशन फॉर लोकल’ अंतर्गत पेडणे मतदारसंघात कोरोना महामारीच्या काळात काम करत आहेत. निस्वार्थी भावनेने मतदारसंघात अखंडितपणे काम करताना ते दिसतायत. राजन कोरगावकर यांना पेडणे मतदारसंघात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पाठवलं आहे, राजन कोरगावकर हे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचे समर्थक आहेत, असा अपप्रचार काही विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजन कोरगावकरांनी स्पष्टीकरण देताना आपण उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समर्थक नसल्याचं सांगितलंय.

हेही वाचाः एसपीसीए अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई

मी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समर्थक नाही

भूमिपुत्रांसाठी काहीतरी करावं या सामाजिक बांधिलकीतून मी हे कार्य करतोय. लोकशाहीच्या मार्गातून कुणीही राजकारणात येऊ शकतो. मी स्वाभिमानी पेडणेकर आहे. या मातीत जन्मलेला आहे, कामा-नोकरीच्या निमित्ताने मडगावला राहत होतो. त्याचा अर्थ मी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समर्थक होऊ शकत नाही, असं कोरगावकर म्हणालेत.

हेही वाचाः प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड अरुण काकडे यांचं निधन

पेडणेकर माणसं नीट ओळखतात

पेडणे मतदारसंघासाठी आणि तालुक्याची माझ्या हातून सेवा व्हावी या उद्देशाने सामाजिक बांधिलकी ठेवून मी काम करतोय. आमचे स्वाभिमानी पेडणेकर कुणाच्याही मायाजाळात अडकणारे नाहीत. ते माणसं नीट ओळखतात आणि मतदान करतात. येणाऱ्या निवडणुकीत पेडणे मतदारसंघातून नक्कीच स्वाभिमानी पेडणेकर पर्रिवर्तन घडवून आणत भूमिपुत्रांना न्याय देतील. या मातीतला, या भूमीत जन्मलेला नागरिकच स्थानिकांच्या समस्या समजू शकतो, तो स्थानिकांसाठी चोवीस तास उपलब्ध होऊ शकतो, असं कोरगावकर म्हणालेत.

हेही वाचाः वेर्ला येथे गाड्यांवर कोसळला आंबा

कोरगावकरांचं सामाजिक कार्य

‘मिशन फॉर लोकल’तर्फे राजन कोरगावकरांनी पेडणे मतदारसंघातून जोरदार सामाजिक कार्य चालू ठेवलंय. त्यात कडधान्य वितरण, मास्क वितरण, पाणी पुरवठा, वेगवेगळे महिलांसाठी प्रशिक्षण, घर – मंदिर – सरकारी कार्यालयांचं निर्जंतुनिकरण, शैक्षणिक – आरोग्यविषयी मदत कार्य त्यांनी जोरात सुरू ठेवलीत. यामुळे त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय. म्हणून त्यांच्याविषयी अपप्रचार सुरू केलाय, असं कोरगावकरांचे समर्थक राजू नर्से म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!