‘गुलाब’ चक्रीवादळाचा गोव्यावरही परिणाम होणार! पावसाची शक्यता

पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : चतुर्थीनंतर काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून पुढचे तीन दिवस पाऊस कासळण्याचा अंदाज आहे. यावर्षी मान्सूनचा वर्षाव समाधानकारक झाला. चतुर्थीतही पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसला. मात्र चतुर्थीनंतर काही दिवस पावसानं विश्रांती घेतली. चक्क कडकडीत उन बघायला मिळालं. काही भागांत अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र संततधार पाऊस फारसा पडला नाही.

गोव्यालाही फटका बसणार?

आता पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याचा प्रभाव गोव्यावरही पडणार आहे. या चक्रीवादळाचा फटका गोव्यालाही बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.

मुसळधार बरसणार

सोमवारपासून पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमार आणि नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, अशी सूचना हवामान विभागाकडून करण्यात आलीय. सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या काळात किमान 40 किलोमीटर प्रतितास या वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. गुरुवारनंतर स्थिती पूर्वपदावर येईल, अशी चिन्हं आहेत.

गुलाबमुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान, गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवला असून विशाखापट्टणमसह परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय, तर जोरदार वार्‍यांमुळे वित्तहानीही झालीय. या वादळात एका मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाला. हे वादळ पश्चिमेकडे सरकत असून गोव्यासह कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!