चुकीच्या मीटर रिडिंगमुळे भरमसाट पाणी बिल…

सरकारने सुधारणा न केल्यास न्यायालयात जाऊ : ग्राहक नरेंद्र सुतार, वैभव बिरजे यांचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : पाणी मीटर रिडिंग चुकीच्या पद्धतीने घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाकडून लुबाडणूक होत आहे. मीटरचा शेवटचा डिजिटही युनिट म्हणून नोंदवला जातो व त्याद्वारे हजारो रुपयांचे बिल ग्राहकांना दिले जात आहे. राज्य सरकारने हा मोठा घोटाळा चालवला असून यात त्वरित सुधारणा न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा वेर्ला येथील ग्राहक नरेंद्र सुतार व वैभव बिरजे यांनी बुधवारी दिला. 
हेही वाचाःसरकारी नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा…

मीटरमधील पाचवा आकडाही युनिट म्हणूनच नोंदवण्यास सुरुवात

पाणी पुरवठा विभाग जून २०१५ पासून चुकीच्या पद्धतीने मीटर रिडिंग करत आमच्याकडून हजारो रुपये मासिक बिलाची रक्कम वसूल करत आहे. सात वर्षांत साडेचार लाख रुपये आमच्याकडून घेण्यात आले आहेत. चुकीच्या पद्धतीने इतरही ग्राहकांकडून रक्कम वसूल केली असल्याचे आढळून आले आहे. जून २०२२ मध्ये ६५४ युनिटनुसार ४० दिवसांचे १६,३५० रुपये व थकित रक्कम म्हणून १ लाख ९० हजार ४३० रुपयांचे बिल दिले गेले. जानेवारी २०१५ मध्ये नवीन मीटर बसवल्यानंतर मला १५८.७ युनिटचे फक्त २२ रुपये बिल आले होते. त्यानंतर काही दिवस योग्य बिल आले. जून २०१५ पासून मात्र डिजिट मीटरमधील पाचवा आकडाही युनिट म्हणूनच नोंदवण्यास सुरुवात केली. त्यामुळे युनिट व बिलाची रक्कम वाढली, असे सुतार व बिरजे म्हणाले.     
हेही वाचाःप्रेम स्वीकारण्याचा प्रवास – द ब्लू कफ्तान…

चार सदस्यीय कुटुंबाला महिना १३ ते १८ हजार रुपयांपर्यंत बिल

बिलाचे २०१५ ते जून २०२२ पर्यंतचे स्टेंटमेंट घेतल्यानंतर मीटर रिडिंग चुकीच्या पद्धतीने घेतले जात असल्याचे आढळून आले. पाणी पुरवठा विभागाने हा मीटरचा दोष असल्याचे सांगितले. त्यानुसार मीटरचीही तपासणी केली; पण त्यात दोष नव्हता. शेवटी रिडिंगचा दोष असल्याचे स्पष्ट झाले. मीटर रिडिंगवेळी पाचवा डिजीटही युनिट म्हणून नोंद केला जात असल्यानेच चार सदस्यीय कुटुंबाला महिना १३ ते १८ हजार रुपयांपर्यंत बिल येत आहे. त्यामुळे पाणी ४५ ते ४८ रुपये प्रति लिटर पडत असून बाजारात विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटलीपेक्षा दुप्पट, तिप्पट हा दर आहे, असे बिरजे म्हणाले.
हेही वाचाःअभिनय माझ्या आयुष्याचा एक भाग…

माहिती नाकारली

वाढत्या बिलाबाबत आम्ही म्हापसा साहाय्यक अभियंता कार्यालयाकडे तक्रार केली. ११ नोव्हेंबरला आरटीआयच्या माध्यमातून ज्या कंपनीने हे पाणी मीटर बसवले आहेत, त्यांच्याकडून मीटर रिडिंग नेमके कसे घ्यावे व पाचवा डिजिट काय नोंद करतो, याची माहिती मागितली. ही माहिती दिली गेलेली नाही. दोष शोधण्यासाठी आम्ही एका बॅरलमध्ये १३०० लिटर पाणी भरले. तेव्हा १.३ युनिट नोंद व्हायला हवे होते पण मीटर १३ युनिट दाखवत होते. पाणी पुरवठा विभागाने आम्ही आवाज उठवल्यानंतर नवीन मीटर बसवून एक महिना निरीक्षण करूया व रिडिंगमध्ये दोष आढळल्यास सात वर्षांतील जादा बिलाची रक्कम माफ करण्याची हमी दिली आहे. आम्ही नवीन मीटर बसवला आहे. मीटर रिडिंग घेण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेच हा प्रकार घडला असून लोकांनी मीटर रिडिंग घेणारे कर्मचारी कशापद्धतीने रिडिंग घेतात याची पाहणी करून चौकशी करावी. भरामसाट बिल येणार नाही याची खात्री करावी, असे आवाहन नरेंद्र सुतार यांनी केले.
हेही वाचाःआर्थिक फसवणूक प्रकरणात संशयित पती पत्नीच्या जामिनावर आज सुनावणी…

गोव्यात दारूपेक्षाही पाणी महाग

गोव्यात मीटर रिडिंगमध्ये घोळ केला जात आहे. मीटरचा शेवटचा डिजिटही युनिट म्हणून नोंद केला जातो. त्यामुळे भरमसाट पाणी बिल येत आहे. प्रति लिटर ४५ ते ४८ रुपये मोजावे लागत असून राज्यात दारूच्या किमतीपेक्षाही पाणी जास्त दरात दिले जात आहे, असा दावा वैभव बिरजे यांनी केला.
हेही वाचाःप्रादेशिक भाषा संपू देऊ नका : प्रसून जोशी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!