मोठी कारवाई! तब्बल 50 लाख रुपये किंमतीचा तांदूळ जप्त, तारीख बदलून केली जात होती विक्री

तुमच्या ताटातला तांदूळ Expiry Date होऊन गेलेला तर नाही ना?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रोजच्या जेवणातला महत्त्वाचा पदार्थ असलेल्या तांदळासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तुम्ही खात असलेल्या तांदळावरच सवाल उपस्थित झालेत. कारण एका मोठ्या कारवाईमध्ये तब्बल ५० लाख रुपये किंमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर का पॅकिंग केलेला तांदूळ खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

पॅकिंग केलेला तांदूळ खाताय? सावधान!

राज्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तांदूळ खरेदी करताना यापुढे जास्त सावधान राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच काय खरेदीपूर्वी तुम्ही विकत घेत असलेल्या तांदळाच्या पॅकेटवरील तारखाही तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

श्री शांतादुर्गा एग्रीकल्चरल प्रॉडक्टसा बेली तांदूळ, श्री अमरेश्वरी इंडस्ट्रीचा अमर गोल्ड तांदूळ, श्री विजयलक्ष्मी ट्रेडर्सचा तांदूळ, मयुर गोल्ड, अमर गोल्ड, विजय अशा वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या तांदळावर कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं हे सगळं प्रकरण काय?

डिपार्टमेन्ट ऑफ लिग मेट्रोलॉजीने गोव्यात मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपये किंमतीचे तांदूळ जप्त केले आहेत. यामध्ये तांदळाच्या तब्बल ३ हजार ९६ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे तांदूळ विक्रीच्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. राज्यातील वजन-माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमध्ये तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलंय. नितीन पुरुशन यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

आणखी कुठे-कुठे कारवाई?

फोंड्यातील तांदळाच्या साठा करणाऱ्यावर ठिकाणावरुन तब्बल १५० गोण्या जप्त करण्यात आल्यात. याची किंमत अडीच लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. यामध्ये पॅकिंगची तारीख आणि एक्सपायरी डेट यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचं समोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे म्हावळींगे, डिचोलीत तर तब्बल ५०० तांदळाच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमतही तब्बल साडे सात लाख असल्याचं समोर आलंय. यामध्येही तारखांमध्ये छेडछाड करुन या गोण्या पुन्हा विक्रीसाठी पाठवल्या जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हे रॅकेट प्रचंड मोठं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

दरम्यान, खोर्ली गोव्यातही याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून तब्बल ८ लाख रुपये किंमतीच्या ४९६ तांदळाच्या गोण्याही जप्त करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करत वजन-माप खात्यानं मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तांदळाच्या काळ्या बाजारावरच हातोडा मारलाय.

सतर्क राहा, सुरक्षित राहा!

या कारवाईनंतर आता लोकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं जातंय. तांदूळ खरेदी करताना लोकांनी काळजी घ्यावी आणि त्यासाठी खालील बाबी तांदूळ खरेदी करताना तपासून घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

१. नाव आणि उत्पादकाची संपूर्ण माहिती
२. प्रकाराचं नाव
३. कोणत्या देशात उप्तादन केलंय, त्याची माहिती
४. मॅन्युफॅक्चरींग, प्री पॅकिंग आणि इम्पोर्ट केलेल्या दिवसांच्या तारखा
५. एमआरपी देखील तपासून घ्यावी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!