गिरीश चोडणकरांनी चालबाजपणा सोडावा : साधले

...त्यांनी विदुषकापेक्षा, नेत्यासारखे वागणे या महामारीच्या काळात अपेक्षित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कॉंग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी कोविड महामारीच्या काळात सरकारवर अकारण टीका करत चालवलेला चालबाजपणा थांबवावा, आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे खोटे कारण पुढे करून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी, ही श्री. चोडणकर यांची अलीकडील मागणी हा या चालबाजपणाचा उत्कृष्ट नमूना आहे, अशी टीका भाजप गोवा प्रदेश माध्यम विभाग संयोजक संदेश साधले यांनी केलीय.
ते म्हणतात, कॉंग्रेस आता नेस्तनाबूत होण्यास आली आहे. त्यांनी जनाधार पुरता गमावला आहे. निवडणुकांत कॉंग्रेसला म्हणूनच मतदारांना लाथाडले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला कधी राज्यात विजय मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अशी चालबाजपणाची विधाने करून जनमत आपल्याबाजूने येईल असे श्री. चोडणकर यांनी वाटून घेणे चुकीचे आहे.
राज्यातील भाजप सरकारने कोविड महामारीने राज्यात फैलावू लागल्यावर विक्रमी वेळेत राज्यात आरोग्य यंत्रणा उभी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात महामारीचा प्रकोप होईल, असे कोणाला वाटले नसतानाही सरकारने सारी तयारी केली आहे.
रुग्णसेवेसाठी वैद्यकीय प्राणवायुच्या पुरवठ्यापासून रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आऱोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. श्री. चोडणकर कधीच पूर्ण होऊ न शकणारी स्वप्ने पाहत घऱी शांतपणे झोप घेत होते तेव्हा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत होती.
श्री. चोडणकर यांची ही मागणी आपला जीव धोक्यात घालून महामारीत काम करणाऱ्या कोविड योद्धांच्या मनोधैर्यावर विपरीत परीणाम करणारी आहे. अशा मागणीने श्री. चोडणकर यांचेच हसे झाले आहे. त्यांनी विदुषकापेक्षा, नेत्यासारखे वागणे या महामारीच्या काळात अपेक्षित आहे.
आमचे साऱ्या विरोधकांना आवाहन आहे, की त्यांनी कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारची साथ द्यावी. गोमंतकीयांचा भाजपच्या सरकारवर पुर्ण विश्वास आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य तितक्या सुविधांची निर्मिती सरकार करत आहे. विरोधकांनीही या सरकारच्या कर्तव्यपूर्तीत आपले योगदान द्यावे. आम्ही सारे मिळवून कोविडला हरवूया.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!