5 राज्य आणि 2 पोटनिवडणूक निकालाचा आगामी गोवा विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होणार?

पश्चिम बंगालप्रमाणे गोव्यात प्रादेशिक पक्ष किमया करु शकतात का?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : ५ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका रंगतदार झाल्या. कोरोना काळात घेतलेल्या या निवडणुका बऱ्याच चर्चिल्या गेल्या. निवडणुका घेणं गरजेचं होतं, नव्हतं यावरुनही चर्चा झाली. पण आता निवडणुका होऊन, निकालही लागलेत. त्यामुळे लोकशाहीचा अविभाज्य घटक असलेल्या निवडणुकांच्या निकालांचा अर्थ आता लावला होताय. हा अर्थ आगामी गोवा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनंही महत्त्वाचा आहेच. येत्या काही महिन्यांत गोव्यातही विधानसभा निवडणुका लागणार आहेत. जे निकाल ५ राज्यांमध्ये लागले, पोटनिवडणुकांमध्ये दिसले, त्याचा गोव्याच्या विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होणार, यावरुन चर्चांना उधाण आलंय.

५ राज्यांमध्ये काय झालं?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं. दरम्यान, भाजपच्याही पश्चिम बंगालमधील जागा वाढल्यात. पण एकहाती सत्ता ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन करु शकेल, इतकं निर्विवाद यश त्यांना बंगलच्या जनतेनं मिळवून दिलं आहे. भाजप नंबर दोनचा पक्ष पश्चिम बंगलामध्ये राहिलाय. तर काँग्रेस आणि इतर जे प्रादेशिक पक्ष होते, त्यांच्यावर पुन्हा एकदा आत्मचिंतनाची वेळ आली आहे. आता जर पश्चिम बंगालमध्ये दीदी भाजपला मात देऊ शकतात, तर गोव्यातही प्रादेशिक पक्ष भाजपला भारी पडू शकतात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विरोधकांना इनस्पिरेशन

मगो आमदार सुदिन ढवळीकर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावर आपलं मत माडलंय. ते म्हणालेत की,

पश्चिम बंगालच्या निकालांनी प्रादेशिक पक्षांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अशीच किमया गोव्यातही घडू शकते. त्यासाठी प्रादेशिक पक्षांनी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे.

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनीही काहीसं अशाच पद्धतीचं ट्वीट रविवारी केलं होतं. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निकालातून गोव्यातील प्रादेशिक पक्ष प्रेरणा घेत आहेत, असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही.

गड आला, पण ग्राम गेला आणि घाम फोडला!

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममता बॅनजी या नंदीग्राम मधून विधानसभा निवडणूक हरल्या आहेत. दिवसभर रंगतदार लढत नंदीग्राममध्ये बघायला मिळत होते. त्यावरुन ‘गड आला, पण ग्राम गेला’ अशी बातमीही दैनिक लोकमतनं केली आहे. अर्थात ग्राम जरी गेलं असलं तरी ममता दीदींनी भाजपच्या स्टार प्रचारकांना घाम फोडलाय, हे निवडणूक निकालातून स्पष्ट होतंय. सर्व शक्ती पणाला लावून प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा यांच्यापुढे बंगालच्या अस्मितेचा मुद्दा ममता दीदींसाठी महत्त्वाचा ठरला. पण असे कोणते मुद्दे गोव्यातील प्रादेशिक पक्ष सध्या मांडत आहेत, जे त्यांना भाजपला मात देण्यासाठी पुरुन उरतील? याचाही विचार व्हायला हवा.

पश्चिम बंगलानंतर जाऊयात आसाममध्ये. आसाममध्ये सत्ता कायम राखण्यात भाजप आघाडीला यश आलंय. काँग्रेसला मात देण्यात भाजपला जे २०१४पासून यश मिळताना पाहायला मिळतंय. तेच आसाममध्येही पाहायला मिळालं. पुद्दूचेरीतही तेच पाहायला मिळालं. आता या सगळ्यावर एक युक्तीवाद असाही केला जातोय, की जिथे काँग्रेसशी प्रमुख लढत होते, तिथे भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी होतंय. हा ट्रेन्ड सांगताना, लोकं मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि काही प्रमाणात महाराष्ट्राचंही उदाहरण देतात. म्हणजे जरी काँग्रेसच्या जास्त जागा आलेल्या असल्या, तरी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावते आणि काँग्रेसला पछाडून सरकार स्थापन करते, असा युक्तीवाद केला जातो. काही अंशी हा युक्तिवाद खराही आहे.

आता उरलं तामिळनाडू आणि केरळ. केरळमध्ये दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात डाव्यांना यश आलंय. लेफ्ट डेमोक्रेटीक पार्टीनं केरळमध्ये विजय मिळवला. आता हा खरा पराभव तर काँग्रेसचाही आहे. कारण लोकसभेची जागा केरळमधून जिंकलेल्या राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण विधानसभेसाठी काँग्रेसला फारसा फायदा झाल्याचं अजिबात दिसलं नाही. भाजपनंही तिथं मार खाल्लाच आहे. केरळमध्ये भाजप आणि काँग्रेस दोघांनाही स्थानिक पक्षांनी मात दिली आहे. अण्णा द्रमूक आणि द्रमूक यांच्यात थेट लढत तामिळनाडूत दिसली. तिथेही द्रमूक म्हणजे डीएमकेने बाजी मारलीये.

आता पोटनिवडणुकांचा विचार केला, तर दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये भाजप जिंकली. पंढरपूर आणि बेळगावात दोन्हीही ठिकाणी भाजप उमेदवाराचा विजय झाला. बेळगावात संजय राऊतांनी येऊन प्रचारसभा घेत जोरदार हल्लाबोल केला होता. पण त्याचा परिणाम शून्य झाल्याचं निकालात दिसतंय. तर तीन पक्षांना एकत्र येऊनही पंढरपुरात भाजपला मात देता आली नाहीये. त्यामुळे जिथे जिथे काँग्रेसशी थेट लढत होते, तिथे तिथे भाजपचा विजय होतो, असा युक्तिवाद केला होता.

आता एकदा जागा पाहुयात कोणत्या राज्यात कुणाला किती आहेत?

पश्चिम बंगाल 292 – मॅजिक फिगर – 147
तृणमूल 213
भाजप 77
डावे आघाडी 00
अपक्ष 2

आसाम 126 मॅजिक फिगर – 64
भाजप आघाडी 75
काँग्रेस आघाडी 50
अपक्ष 1

तामिळनाडू 234 मॅजिक फिगर – 118
डीएमके 156
एआयडीएमके 78

पुद्दुचेरी 30 मॅजिक फिगर – 16
भाजप आघाडी 16
काँग्रेस आघाडी 8
इतर 6

केरळ 140 मॅजिक फिगर – 71
डावे (LDF) 99
लोकशाही आघाडी (UDF) 41
भाजप आघाडी 00
इतर 00

गोव्याचा निकालाचा पश्चिम बंगालशी अर्थ लावणं योग्य होईल का?

पश्चिम बंगलामध्ये भाजप आता हळूहळू जम बसवते आहेत. गोव्यात तसं नाहीये. गोव्यात भाजप पहिल्यापासूनच आहे. अर्थात पर्रीकर असतानाचं भाजप आणि आताच भाजप यात फरक आहे. मात्र भाजप हा गोव्यातला एक प्रमुख पक्ष पहिल्यापासूनच होता आणि आहे. पश्चिम बंगालमध्ये तसं नव्हतं. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विरोधातच नव्हे, तर काँग्रेसच्याही विरोधात ममता दीदी एकहाती लढल्या. प्रादेशिक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील टोकाचा संघर्ष या निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाला होता. फोडाफोडीचं राजकारणं, हिंसा हे सगळंही निवडणुकीच्या आखाड्यात पश्चिम बंगालनं अनुभवलं.

मुळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या जागा खूप आहेत. तिथे निवडणूक ही अनेक टप्प्यात पार पडली. गोव्यात विधानसभेच्या जागा आहे फक्त ४०. त्यामुळे या ४० जागांसाठी प्रादेशिक पक्षांनी केलेली गेल्या काही वर्षातली तयारी जर पाहिली, किंवा झेडपी आणि पालिका निवडणूक निकालांचा अंदाज घेतला तर भाजपला गोव्यात प्रादेशिक पक्ष डोकेदुखी ठरतील, अशी शक्यता कमीच आहे. दुसरीकडे जे प्रादेशिक पक्ष आहे, त्यांच्या कितपत एकजूट आहे, त्यांनी जनतेचे प्रश्न किती सोडवले आहेत किंवा जनतेच्या प्रश्नांना किती पोटतिडकीनं मांडलंय, हा ही कळीचा मुद्दा ठरणार आहे.

पर्रीकर असताना तेच भाजपचे सुप्रिमो होते. त्यांना दिल्लीत जाण्याची गरज फार थोड्या वेळा लागली. मात्र आताच्या राज्यातील भाजपच्या दिल्लीवाऱ्या पाहिल्या तर राज्य हे केंद्रातूनच चालवलं जातं की काय, अशीही शंका घेतली जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर जर आसाम आणि पुद्दुचेरीचा निकाल पाहिला, तर प्रादेशिक पक्ष किमया करु शकतील, असं म्हणणं आताच घाईचं ठरेल. मात्र तूर्तास तरी प्रादेशिक पक्षांनी पश्चिम बंगालच्या निकालातून प्रेरणा घ्यायला हरकत नाही. बंगालच्या दीदी जे करु शकतात, ते गोव्याचे दादाही करु शकतात. अशक्य असं जगात काहीच नाही. निवडणूक निकालांत गोव्यातील प्रादेशिक पक्षांना किमया करुन दाखवायची असेल, तर त्यांना मतदार राजावर जादू करावी लागेल. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!