नेटवर्कचं नाही, तर ऑनलाईन शिक्षण घ्यायचं कसं?

विद्यार्थी तसंच पालकांचा सरकारला प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील कोरोना महामारी हळुहळू आटोक्यात आल्यानंतर 21 जून पासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालीये. कोरोना आटोक्यात आलाय मात्र तो पूर्ण गेलेला नाही. असं म्हटलं जातंय की कोरोनाची येणारी तिसरी लाट ही मुलांसाठी घातक असणारेय. याच पार्श्वभूमीवर सरकारने 21 जूनला जरी शैक्षणिक वर्षं सुरू केलं असलं, तरी वर्ग मात्र ऑनलाईन घेण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्यात. त्यामुळे या वर्षीदेखील मागच्या वर्षीप्रमाणेच मुलांना घरात राहून ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करावा लागणारेय. दरम्यान राज्यात अजूनही असे अनेक दुर्गम भाग आहेत जिथे नेटवर्क पोहोचलेलं नाही. त्यामुळे नेटवर्कचं नाही, तर ऑनलाई शिक्षण घ्यायचं कसं? असा सवाल विद्यार्थी तसंच पालकांनी उपस्थित केलाय. यावर तोडगा काढताना नेटवर्कची समस्या अलणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना ‘वर्कशीट’च्या माध्यमातून शिक्षण देण्याची व्यवस्था करणार असल्याचं शिक्षण विभागाने जाहीर केलंय.

हेही वाचाः सर्वाधिक उत्पन्नाची केंद्राला हमी…का होतील पेट्रोल-डिझेलचे दर कमी ?

नेटवर्क इश्यूमुळे मागच्या वर्षी निर्माण झाल्या होत्या समस्या

मुलांचं ऑनलाईन शिक्षण म्हणजे आमच्या डोक्याला ताप अशा स्वरुपातील प्रतिक्रिया पालक वर्गाकडून येतायत. नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी एकच भीती पालकांना दिवस रात्र वाटते. त्यामुळे नेटवर्क शोधण्यासाठी पालक जीवाचं रान करतायत. काही ठिकाणी तर विद्यार्थी स्वतः नेटवर्क शोधण्यासाठी उंच टेकड्या, डोंगर अशी ठिकाणी जातायत. त्यामुळे या वर्षी ऑनलाईन क्लासेस जाहीर झाल्यानंतर पुन्हा मागच्या वर्षीप्रमाणे नेटवर्क शोधावा लागणार, या विचाराने पालक त्रस्त झालेत.

हेही वाचाः आयआयटी आंदोलनातील ‘त्या’ मुलांवरील गुन्हे मागे घ्या

सत्तरीत नेटवर्कची मोठी समस्या

राज्यातील सत्तरी भाग हा तसा दुर्गमच. या भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतोय. नगरगाव पंचायत क्षेत्रातील साट्रे, दरोडे, कोदाळ, माळोली, नानोडा, बांबर, सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ, कुमठोळ, शेळपे, बुद्रुक, सावर्डे, सोनाळ, धावे ठाणे पंचायत क्षेत्रातील चरावणे, हिवरे गोळवली, सुर्ला, रिवे, डोंगुर्ली, खोतोडा पंचायत क्षेत्रातील खोतोडे, मलपण, शेळपे, गुळेली पंचायत क्षेत्रातील पैकुळ, मुरमुणे या गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्कचं नसल्याचं दिसून येतंय.

आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांनी करायचं काय?

सत्तरीतील अनेक कुटुंबांची परिस्थिती ही बेतास बात आहे. अनेकांचं पोट हे हातावर आहे. त्यामुळे  ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन्स, 4जी इंटरनेट यावर पैसा खर्च करणं प्रत्येकालाच जमणारं असं नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी जिथे अजून स्मार्टफोनच हातात घेतलेला नाही, तिथे ऑनलाईन शिक्षण घेणं दूरच.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!