दिल्लीत पाच वर्षांत किती नोकऱ्या दिल्या?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दिल्लीतील बेरोजगारी​ संपवा, त्यानंतरच गोव्याकडे लक्ष द्या. आपण कधीच सत्तेत येणार नाही हे माहीत असतं, तेच लोकांना मोठमोठी आश्वासनं देत असतात, असं म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

दिल्लीत पाच वर्षांत किती नोकऱ्या दिल्या?

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल गोंयकारांना नोकऱ्यांबाबत विविध आश्वासने देत आहेत. यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना छेडलं असता ते म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील किती लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत, त्याचा आकडा जाहीर करावा. त्यानंतरच गोंयकारांना सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन द्यावं. केजरीवाल नोकऱ्यांबाबत जनतेला जी आश्वासने देत आहेत, ती आपल्या सरकारने याआधीच पूर्ण केली आहेत. राज्यातील आयटीआय कॉलेजमधून कौशल्य शिक्षण दिलं जात आहे. मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून सरकारने अनेकांना खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. याचा केजरीवाल यांनी अभ्यास करावा.

जनता निश्चित आपल्यावरच विश्वास ठेवेल

कोविड काळात आर्थिक परिस्थिती​ बिकट असतानाही सरकारने साधनसुविधा उभारणी सुरूच ठेवली. कृषी, फलोत्पादन, पशुपालन आदींसारख्या क्षेत्रांत अनुदान दिले. विद्यार्थ्यांना फीमध्ये कपात करून दिलासा दिला. सामाजिक योजना सुरू ठेवल्या. मोफत पाणी मिळवून दिले. त्यामुळे जनता निश्चित आपल्यावरच विश्वास ठेवेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

तृणमूलला गोवा आवडत असावा!

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तृणमूल काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारले असता, गोवा सर्वांनाच आवडतो. त्यामुळेच कदाचित तृणमूल काँग्रेसने हालचाली सुरू केल्या असाव्यात, असे उत्तर त्यांनी दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!