बेपत्ता सिध्दी गिरीहून कळंगुटला कशी पोचली?

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : नास्नोळा येथील मयत सिध्दी नाईक या 19 वर्षीय युवती पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली, हे कोडे अद्याप पोलिसांना सोडवता आलेले नाही. म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही देखील बंद असल्याने ती बस स्थानकावर होती की नाही याची देखील खात्री पटलेली नाही. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाचा गुंता सोडविण्यास पोलिसांची धावपळ सुरू आहे. हे प्रकरण अजून ताणून धरू नये, अशी जबानी दिल्यानंतर पोलिसांकडूनच योग्य शोध तपास न झाल्याचा ठपका मयत युवतीच्या वडिलांनी ठेवल्याने पोलीसही संभ्रमात सांपडले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि आमदार ग्लेन टिकलो यांनी नाईक यांच्या घरी भेट देऊन त्यांना या प्रकरणाचा पुर्नतपास करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंचनामा आणि तपासकाम
मयत सिध्दीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पण ती अर्धनग्न अवस्थेत कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले? असा सवाल निर्माण झाला आहे. मयतीचा अर्धविवस्त्र अवस्थेत मृतदेह कळंगुट समुद्रकिनारी सांपडला होता. यावरून लोकांत तर्कवितर्क सुरू आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य पंचनामा व तपासकाम होऊ शकलेले नाही असा आरोप केला आहे.
शेवटचं सिद्धीला कुणी पाहिलं?
मयत युवती गिरी येथील ग्रीनपार्क जंक्शनवरून बेपत्ता झाली होती. घरातून निघताना तिने जे कपडे परिधान केले होते, ते तिच्या अंगावरून कसे गायब झाले. हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. म्हापसा बस स्थानकावर मयतीच्या ओळखीच्या एका बस वाहकाने त्या दिवशी तिला पाहिले होते. ती आपल्याच विचारात मग्न होती. त्यामुळे तो वाहक तिच्या जवळ विचारपूस करण्यास गेला नाही, अशी माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

सीसीटीव्ही बंद असल्याचा फटका
सिध्दीला तिच्या वडिलांनी पर्वरीला जाणार्या प्रवासी बस मध्ये ग्रीन पार्क जंक्शनवर बसविले होते. तर ती बसमधून कुठे उतरली व म्हापसा बस स्थानकावर कोणत्या बसने आली. तिथून ती कुठे गेली. कळंगुट कि अन्य समुद्रकिनारी याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पण म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्याने ती कोणत्या बसमध्ये बसली होती. याचा तपास लावणे पोलिसांना शक्य झालेली नाही. त्या दृष्टीने पोलिस कळंगुट तसेच इतर नजिकच्या समुद्रकिनारी भागातील रस्त्यावरील आस्थापनांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहे.
मयत सिध्दी हिच्या वडीलांनी आपली मुलगी या जगात आता नाही आहे, त्यामुळे अजून हे प्रकरण आपल्याला ताणून धरायचे नाही. यातून आपली मुलगी व कुटूंबाचीच बदनामी होईल, असे पोलिस जबानीत नमूद केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पण शनिवारी त्यांच्या घरी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि आमदार ग्लेन टिकलो यांनी भेट दिली. त्यानंतर मयतीच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या बेपत्ता मुलगीला शोधण्यासाठी म्हापसा पोलिसांनी वेळीच तपास न केल्याने तिल्हा आम्ही गमावल्याचा आरोप केला. तसेच राज्य पोलिसांकडून अशाच प्रकारे निष्काळजीपणा केला जात असल्यामुळे गोव्यातील मुलींना जीव गमवावा लागत असल्याचा आरोपही केला आहे.