चाय ‘गरम’ : वेळ दरवाढीची…पण वेळेला मात्र हवाच !

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चहाचे दर 25 टक्क्यांनी 'गरम'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोना महामारी आणि अनुकूल वातावरणाअभावी आसाममधील चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पर्यायाने चहाच्या दरात दरवर्षीच वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. यावर्षी ही वाढ 25 टक्के इतकी आहे. तथापि, जुलै महिन्यात उत्पादन वाढण्याची अपेक्षा असून किमतीही कमी होण्याची आशा आहे. परंतु किमतीत कितीही चढ आणि उतार झाला तरीही चहाचे शौकीन आपली ‘तलफ’ भागवल्याशिवाय राहत नाहीत, ही बाबही तितकीच सत्य आहे.

देशात निम्म्याहून अधिक चहाचा पुरवठा आसाममधूनच होतो. गुवाहाटी आणि कोलकात्यात या वर्षी सुरुवातीला झालेल्या २३ साप्ताहिक लिलावांत आसामच्या चहाची किंमत २२४ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती. २०२० मध्ये याच कालावधीत हे दर १७८.६ रुपये प्रतिकिलो होते. यात पारंपरिक आणि सीटीसी अशा दोन्ही चहाच्या प्रकारांचा समावेश आहे.

पारंपरिक चहा म्हणजे चहाची पाने मजूर आपल्या हाताने तोडतात. पूर्ण पानाची चहा अशाच प्रक्रियेद्वारे तयार केली जाते. तर मिलमध्ये बेलनाकार रोलर्सवर प्रक्रिया केलेल्या चहाला सीटीसी चहा म्हटले जाते. टी ब्रोकरेज फर्म परकॉर्नच्या मते गुवाहाटी ई-ऑक्शन सेंटरमध्ये (जीटीएसी) या वर्षी ११ जूनपर्यंत दोन्ही चहांचे लिलावी मूल्य २१२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. मागील वर्षी ते १७३.७० रुपये आणि २०१९ मध्ये ११९.२३ रुपये प्रतिकिलो होते. तर कोलकात्यात ते २४०.८७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. २०२० मध्ये कोलकात्यात १८४.३३ रुपये आणि २०१९ मध्ये १४९.८३ प्रतिकिलो मूल्य बोली लावली गेली होती.

उत्तर भारतातील चहाची निर्यात २०२१ च्या पहिल्या तिमाहीत घटून ती २.७३ कोटी किलोवर थांबली. २०१९ च्या पहिल्या तिमाहीत ती ३.९६ कोटी किलो होती. केन्याई सीटीसी चहाचे दर कमी असल्याने अफ्रिकन देशात मागणी वाढली आहे. आसाम चहाचे उत्पन्न ४.५ कोटी कि.ग्रॅ. झाले होते. एप्रिल २०१९ मध्ये ते ३.१५ कोटी किलो होते. दरम्यान, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात प्रीमियम हलमारी चहा जीटीएसवर ६२१ रुपये किलो दराने विकली गेली. चांगल्या दर्जाच्या चहाला मोठी मागणी आहे, असं दिनेश बिहानी, सदस्य, कोअर कमिटी, जीटीएसी यांचं म्हणणं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!