‘फलोत्पादन’कडून स्थानिक भाज्यांच्या दरांत मोठी कपात!

शेतकऱ्यांत नाराजी; ‘स्वयंपूर्ण गोवा’बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित, अनेकजण शेतीपासून दुरावण्याची भीती

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : परावलंबी गोव्याला सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’चा नारा दिला. २ ऑक्टोबर २०२० पासून या मोहिमेला सुरुवातही केली. या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या भाज्यांना चांगले दर देऊन प्रोत्साहन देण्याऐवजी फलोत्पादन महामंडळाने हे दर कमी करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे स्थानिक भाजी उत्पादक शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

भेंडी, गवार आणि हिरवी मिरची या तीन भाज्यांची स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. अनेकांचे संसारही त्यावर अवलंबून आहेत. पण, फलोत्पादन महामंडळाने जानेवारी ते जून २०२० पेक्षाही कमी दर चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांसाठी जारी केल्याने अनेकांनी भाजी लागवडच बंद केल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.

फलोत्पादन महामंडळाकडून प्रत्येक महिन्यात दोन टप्प्यांत भाज्यांचे दर निश्चित केले जातात. प्रत्येकी वर्ष जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर अशा दोन टप्प्यांतील दर शेतकऱ्यांना दिले जातात. जानेवारी ते जून २०२० या सहा महिन्यांत दिलेले आणि जानेवारी ते जून २०२१ या महिन्यांत देण्यात आलेल्या दरांत बरीच तफावत आहे. २०२० पेक्षा २०२१ मध्ये शेतकऱ्यांना प्रतिकिलोमागे २० ते २५ रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. सर्वाधिक लागवड होणाऱ्या भेंडी, गवार, हिरवी मिरचीसह कांदा, टोमॅटो, कारले, दुधी भोपळा, वांगी, काकडी, गाजर, सुरण, तेंडली आदी सर्वच भाज्यांचे दर फलोत्पादन महामंडळाने कमी केल्याने शेतकऱ्यांतील चिंता वाढली आहे. महामंडळाने हेच दर कायम ठेवल्यास किंवा ते पुन्हा कमी केल्यास स्थानिक शेतकऱ्यांची संख्या आणखी कमी होईल. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून स्थानिक शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळवून द्यावे, अशी मागणी धारबांदोडा येथील वरद सामंत या शेतकऱ्याने केली.

शेतकरी वरद सामंत म्हणतात…

करोना आणि स्वयंपूर्ण गोवाच्या निमित्ताने राज्यातील युवक भाजी लागवडीकडे वळत आहेत. पण, फलोत्पादन महामंडळाने भाज्यांचे दर कमी केल्याने अनेकांना त्याचा फटका बसला आहे.

अनेक युवा शेतकरी आपल्याकडे भाजी लागवडीवेळी सल्ल्यासाठी येतात. पण दर कमी होत असल्याने त्यांना कोणत्या भाज्या लावण्याचा सल्ला द्यावा, हेच आपल्याला कळत नाही.

फलोत्पादन महामंडळाने दर वाढवण्याऐवजी ते कमी करण्यावर भर दिल्यास अनेक शेतकरी शेती करणेच सोडून देतील. त्याचा भविष्यात राज्याला आणखी फटका बसेल.

फलोत्पादन महामंडळाने आठवड्यातून सहा दिवस शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करावा.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : प्रभुदेसाई

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती तसेच भाजी लागवडीसाठी उतरावे, यासाठी सरकारने त्यांना समाधानकारक दर देणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेटही मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे यासंदर्भातील मागणी करू. तसेच शेती उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनेही त्यांच्याशी चर्चा करू, असे कृषी विभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी उदय प्रभुदेसाई म्हणाले.

दरांतील तफावत

भेंडी (प्रतिकिलो रुपयांत)

जानेवारी
२०२० – ४३/५१
२०२१ – ४६/४०
फेब्रुवारी
२०२० – ५५/५४
२०२१ – ३३/२५
मार्च
२०२० – ५९/४९
२०२१ – २४/३०
एप्रिल
२०२० – ३७/३५
२०२१ – ४२/३८
मे
२०२० – ३१/२९
२०२१ – ३०/२८
जून
२०२० – ३३/४५
२०२१ – ३६/३०

गवार (प्रतिकिलो रुपयांत)

जानेवारी
२०२० – ४७/४६
२०२१ – ३६/३८
फेब्रुवारी
२०२० – ५९/६२
२०२१ – २५/२६
मार्च
२०२० – ५५/४८
२०२१ – २६/३०
एप्रिल
२०२० – ३७/३३
२०२१ – ४१/३६
मे
२०२० – ३१/२७
२०२१ – ३७/३७
जून
२०२० – ३४/४५
२०२१ – ३३/३१

हिरवी मिरची (प्रतिकिलो रुपयांत)

फेब्रुवारी
२०२० – ४९/५४
२०२१ – ३३/३३
मार्च
२०२० – ६१/६२
२०२१ – ३०/२७
एप्रिल
२०२० – ५७/५३
२०२१ – २५/२३
मे
२०२० – ४६/५०
२०२१ – २५/२६
जून
२०२० – ४९/५९
२०२१ – ३५/३७

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!