#प्रामाणिकपणा : ‘त्यांनी’ परत केले तब्बल साडेसात लाख रुपये किमतीचे चेक

साखळी-डिचोली मार्गावर सापडले दोन चेक

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : स्वार्थी मनोवृत्तीची उदाहरणं पावलोपावली आढळत असताना साखळीत प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं पाहायला मिळालं. साखळीहून डिचोलीला जात असताना तिघांना साडेसात लाख रुपये किमतीचे दोन चेक सापडले. मात्र त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत हे चेक संबंधितांचा सुपूर्द केले.

रमेश आमोणकर, उमेश आमोणकर आणि किशोर पार्सेकर हे तिघेजण साखळीहून डिचोलीला जात होते. वाटेत त्यांना एक चेक आढळून आला. या चेकवर तब्बल 2 लाख 41 हजार रुपये किंमत नोंद केली होती. अडिच लाखाचा हा चेक बँकेत वटवून ते काही मिनिटांत लखपती होउ शकले असते. मात्र त्यांनी तसं न करता याबाबत पोलिस खात्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या उज्ज्वल हळर्णकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी चेकवरील माहितीच्या अनुषंगाने कॅनरा बँकेच्या साखळी शाखेत जाउन चौकशी केली असता, हा चेक हाउसिंग बोर्ड, साखळी इथल्या मोहम्मद के. सैफी यांचा असल्याचं निष्पन्न झालं.

दरम्यान, आपले चेक हरवल्याचं सैफी यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी साखळीत जाउन कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. दोन्ही चेक ब्लॉक करण्यात यावेत, म्हणचे ते कोणीही वटवू शकणार नाही, असं त्यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना सांगितलं. तसं लेखी निवेदनही त्यांनी दिलं. परंतु दोन चेक असल्यानं दोन वेगवेगळी निवेदनं देण्याची सूचना अधिकार्‍यांनी केली. त्यासाठी सैफी बाहेर गेले. निवेदन तयार करून पुन्हा बँकेत आले असता, त्याच वेळी वरील तिघेही चेक परत करण्यासाठी बँकेत आल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं. सैफी यांनी आपला आणखी एक चेक हरवला असल्याचं सांगून ज्या जागेवर हा चेक आढळला, तिथे शोध घेण्याची विनंती केली. दुसरा चेकही आधीच्याच जागेवर रस्त्यालगत पडलेला दिसून आला. या चेकवर 4 लाख 99 हजार रक्कम नोंद केली होती. हे दोन्ही चेक सैफी यांच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रामाणिकपणाबद्दल रमेश आमोणकर, उमेश आमोणकर, किशोर पार्सेकर आणि उज्ज्वल हळर्णकर यांचं अभिनंदन होत आहे.

अब्बास रिश्ते यांनी या संदर्भात केलेलं फेसबुक लाईव्ह पाहा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!