प्रामाणिकपणा! पोलिसांनी ‘त्या’ प्रवाशाला केली बॅग परत

थिवी रेल्वेस्थानकावरील प्रकार; बॅगमध्ये होता दोन लाखांचा मुद्देमाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: थिवी येथील रेल्वे पोलिसांकडून दोन लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग प्रवाशाला परत करण्यात आली. गुजरात येथून आलेला प्रवासी १ लाख रोख व लॅपटॉप असलेली बॅग रेल्वेस्थानकावर विसरून गेला होता.

गस्त घालताना सापडली बॅग

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिवी रेल्वेस्थानकावर नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना कॉन्स्टेबल नारायण राम यांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक बॅग आढळून आली. चौकशीअंती ती बॅग स्थानकावरील कुणाची नसून कुणीतरी ती बॅग विसरून गेलेला असण्याची शक्यता होती. त्यामुळे योग्य तपासानंतर ज्या प्रवाशाची ती बॅग होती त्याला फोनवरून कळवण्यात आलं.

अहमदाबाद – गुजरात येथील प्रवासी विसरला प्लॅटफॉर्मवर बॅग

अहमदाबाद – गुजरात येथील प्रवासी आदित्य भंडारी हा २१ सप्टेंबर रोजी थिवी रेल्वेस्थानकावरील दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उतरला होता. भंडारी यांनी सांगितले की, ओखा – एर्नाकुलम या गाडीतून अहमदाबाद ते थिवी असा प्रवास केला. मित्रांसमवेत जाण्याच्या गडबडीत रोख १ लाख रुपये, एपल कंपनीचा लॅपटॉप व तीन हार्डडिस्क असलेली बॅग स्थानकावरच विसरलो. थिवी रेल्वे पोलिसांकडून बॅग व साहित्याची ओळख पटवून त्यानंतर सर्व साहित्य प्रवाशाला सुपूर्द करण्यात आले.

प्रवासी आदित्य भंडारी यांनीही रेल्वे पोलिसांचे आभार मानत कौतुक केलं.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!