आता कोविड रुग्णांसाठी होम आयझोलेशन फक्त 10 दिवसांचं

लक्षणं दिसल्यापासून 10 दिवस आयझोलेशनचा कालावधी; होम आयझोलेशन संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यापासून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही नियम लागू करण्यात आले होते. त्यातलाच एक म्हणजे कोरोनाची लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ म्हणजेच घरात विलगीकरण करून घेण्याची परवानगी देण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार हे विलगीकरण 17 दिवसांचं होतं. पण आता या नियमात बदल करण्यात आलाय. होम आयझोलेशन अर्थात गृह विलगीकरणाचे दिवस आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कमी करण्यात आलेत. तसा आदेश देणारं एक परिपत्रक केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलंय.

हेही वाचाः IPL 2021: मुंबई इंडियन्सने जिंकलं मन! परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी

आता होम आयझोलेशन फक्त 10 दिवसांचं

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून होम आयझोलेशन अर्थात गृह विलगीकरण नियमावलीत काही बदल करण्यात आलेत. सुधारित होम आयझोलेशन नियमावलीनुसार आता कोविड रुग्णांसाठी होम आयझोलेशन 17 दिवसांचं नसून फक्त 10 दिवसांचं असणार आहे. फक्त होम आयझोलेशनच्या 10 दिवसांतील शेवटच्या तीन दिवसांत रुग्णाला ताप नसला, तरच हा नियम लागू असणार आहे. लक्षणं दिसल्यापासून 10 दिवस आयझोलेशनचा कालावधी सुरू होणार आहे.

पुन्हा कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही

कोविडमधून बरे झालेले रुग्ण कित्येक भीतीनेच आपण कोरोनातून बरे झालोत की नाही हे बघण्यासाठी पुन्हा कोरोना चाचणी करायचे. पण आता तसं करण्याची गरज नाही. 10 दिवसांत जर तुम्हाला काही होत नसेल तर तुम्हाला धोका नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळे आता कोविड होम आयझोलेशनचा 10 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा कोविडची चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

हेही वाचाः बाबू कवळेकरांचा नवा आदर्श

होम आयझोलेशनदरम्यान ही काळजी घ्या

होम आयझोलेशनमध्ये असलेल्या कोविड रुग्णांनी काही गोष्टींची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. होम आयझोलेशनमध्ये असताना घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपासून, गर्भवती महिलांपासून, लहान मुलं आणि इतर व्याधी असणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहा. वैयक्तिक हायजीन – स्वच्छता पाळा, आणि औषधं वेळेवर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका. घरातला तुमचा वावर मर्यादित ठेवा. घरात वावरताना मास्क वापरा. चुकूनही लोकांमध्ये मिसळू नका, घराबाहेर पडू नका. एका खोलीत एकटे रहात असाल, तर तुमचं रूटीन पाळण्याचा प्रयत्न करा. आणि मन गुंतवून ठेवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!