HIT AND RUN : स्थानिकाला चिरडून दिल्लीचा कारचालक पसार

संशयिताला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : काजूमळ-खोला इथल्या पाशांव फर्नांडिस उर्फ लुलू याला अज्ञात इनोव्हा कारचालकानं ठोकर दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. कारचालकानं तिथून पलायन केलं आणि कार एका ठिकाणी लपवून ठेवली. त्यानंतर मडगावला पसार झाला. हा कारचालक दिल्लीचा असून त्याला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतलाय.

कामावरून सुटल्यानंतर पशांव यानं मुलांसाठी चिकन खरेदी केलं. त्यानंतर पायी चालत तो घराकडे यायला निघाला. त्याचदरम्यान मागाहून आलेल्या कारनं त्याला धडक दिली. पाशांव रस्त्यावर कोसळला आणि जागीच मृत्युमुखी पडला. कारचालकानं तिथं न थांबता धूम ठोकली. काही अंतरावर खोला किनारी भागात कार उभी करून लिफ्ट घेऊन तो मडगावला पळून गेला. स्थानिकांनी पाठलाग केल्यानंतर कार आढळून आली. मात्र कारचालक तोपर्यंत पळून गेला होता.

तीन मुलं पोरकी…

पाशांव याच्या पश्चात वृद्ध आई, बहीण, पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. फरार कारचालकाचं नाव प्रेमकृष्णा आनंद असं असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली. मात्र संशयिताला अटक झालेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. सध्या मृतदेह मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळाच्या शवागारात आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

कारचा नंबर स्थानिकांनी पोलिसांना दिला. कारचालकाची माहितीसुद्धा मिळालीय. मग तीन दिवस होत आले, तरी त्याला अटक झालेली नाही. ज्या अर्थी त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जातेय, त्या अर्थी संशयिताला वाचवण्यासाठी कोणाचा तरी पोलिसांवर दबाव आहे, असा आरोप स्थानिकांनी केलाय. पाशांव हा फर्नांडिस कुटुंबातला एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंब पोरकं झालंय. त्यांचं भवितव्य काय, असा सवाल स्थानिक करतायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!