भीषण! वास्कोत कारची धडक

नवे वाडे येथील एकजण ठार

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को: शांतीनगर येथे बुधवारी सकाळी सहा वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ठोकरल्याने नवे वाडे येथील हुरीलाल जस्वार (४४) हा इसम मरण पावला, तर नवे वाडे येथील सुभाष पाटील व श्वेता पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जीएमसीत दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी वास्को पोलिसांनी टेक्स्टंन परेरा (४५) याला अटक केली.

नक्की काय घडलं?

हुरीलाल जस्वार, सुभाष पाटील, श्वेता पाटील हे नेहमीप्रमाणे पहाटफेरीला गेले होते. त्यानंतर विमानतळ मार्गाने ते पुन्हा आपल्या घरी परत होते. ते शांतीनगर येथे पोहचले असताना मागून भरधाव येणाऱ्या कारची त्यांना धडक बसली. यामुळे ते जखमी झाले.

कार चालक पसार

आपल्या हातून अपघात होऊन काहीजण जखमी झाल्याचं दिसताच कार चालक तिथून पसार झाला. जखमी झालेल्या त्या तीघांना चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तिथे हुरीलाल जस्वार याला मृत घोषित आलं. तर सुभाष पाटील व श्वेता पाटील यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जीएमसीत दाखल करण्यात आल.

कार चालकाला पकडण्यात पोलिसांना यश

या अपघातप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी पसार झालेल्या त्या कारचालकाचा शोध घेण्यास आरंभ केल्यावर तो मांगोरहिल येथील रहिवाशी असल्याचं उघडकीस आलं. त्याला कारसह पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नवे वाडे येथे भाड्याच्या खोलीत राहणारा हुरीलाल हा सुतारकाम करीत होता. त्याच्यामागे पत्नी व दोन लहान मुले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.