गोव्यातील ‘या’ दोन गावात विधवा प्रथेविरुद्धचा ऐतिहासिक ठराव संमत…

कालबाह्य प्रथांना देणार मूठमाती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : तालुक्यातील धारगळ आणि कोरगाव येथे ग्रामसभा झाली. या दोन्ही ग्रामसभांत विधवा प्रथेविरुद्धचा ठराव संमत करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड पंचायतीने विधवा प्रथेच्या विरोधात पहिला ऐतिहासिक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर हा विषय देशभर चर्चिला गेला होता. आता धारगळ आणि कोरगाव पंचायतींनीही हा ठराव मंजूर करून गोव्यातही या पुरोगामी विचारांना बळ मिळवून दिले आहे.
हेही वाचा:महिलांसोबत विवस्त्र अवस्थेत पर्यटकांचे केले चित्रीकरण अन्…

शुभकार्यातही त्यांना इतर स्त्रियांप्रमाणेच आमंत्रण

धारगळ पंचायत क्षेत्रात यापुढे विधवा महिलांची हेळसांड होणार नाही. त्यांना आदरपूर्वक वागवले जाईल. पतीच्या निधनावेळी कुंकू पुसले जाणार नाही, मंगळसूत्र काढले जाणार नाही, बांगड्या फोडल्या जाणार नाहीत, पायातील जोडवी (वेडे) काढली जाणार नाहीत, त्यांना अशुभ मानले जाणार नाही. शुभकार्यातही त्यांना इतर स्त्रियांप्रमाणेच आमंत्रण असेल. याविषयीचा ठराव प्रा. भारत बागकर यांनी मांडला. त्याला श्याम धारगळकर यांनी अनुमोदन दिले. हा ठराव धारगळ ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
हेही वाचा:सुप्रसिद्ध पंजाबी गायकाची हत्या, नक्की काय आहे प्रकरण?

प्रथा बंद करायची असेल तर जनजागृती करावी

धारगळची ग्रामसभा रविवार, दि. २९ रोजी पंचायत सभागृहात  झाली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप उर्फ भूषण नाईक होते. उपसरपंच अनुराधा नाईक, पंच वल्लभ वराडकर, सुनीता राऊळ, सोनाली साळगावकर, प्रदीप पटेकर, अर्जुन कानूळकर, दाजी  शिरोडकर,  सुभाष धारगळकर व्यासपीठावर उपस्थित होते. सरपंच भूषण नाईक यांनी हा ठराव मांडल्याबद्दल प्रा. बागकर यांचे अभिनंदन केले.तालुक्यातील कोरगावची ग्रामसभा रविवारी पार पडली. या ग्रामसभेत विधवा प्रथेच्या विरोधातील ठराव माजी सरपंच तथा पंच स्वाती गवंडी यांनी मांडला. त्याला विनिता मांद्रेकर यांनी अनुमोदन दिले. चर्चेत भाग घेताना पत्रकार प्रकाश तळवणेकर म्हणाले, कोरगावात अशी प्रथा नाही. विधवांचा कोणी अपमान करत नाही. ही प्रथा बंद करायची असेल तर जनजागृती करावी. महिला मंडळांसमोर हा विषय न्यावा. माजी सरपंच सुदीप कोरगावकर, हनुमंत शेटगावकर, विनिता मांद्रेकर, स्मिता नारोजी आदींनी चर्चेत भाग घेतला.
हेही वाचा:’हे’ ५ आमदार भाजपच्या संपर्कात, वाचा सविस्तर…

सरपंचांनी उपस्थितांचे स्वागत केले

सरपंच उमा साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा श्री कमळेश्वर सभागृहात झाली. यावेळी पंच अब्दुल नाईक, कुस्तान कुयेलो, स्वाती गवंडी, प्रमिला देसाई, वसंत देसाई, माधव पालयेकर, नियुक्त सदस्य मुकुंद जाधव, समील भाटलेकर आदी उपस्थित होते. पंचायत सचिव कोरगावकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम केला. सरपंच उमा साळगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 
हेही वाचा:गुजरात टायटन्स पहिल्याच हंगामात आयपीएल विजेते…

शेकडो वर्षांपासून काही रूढी-परंपरा समाजात चालत आल्या आहेत. यांपैकी काही परंपरांचा समाजाला काहीच फायदा नाही, उलट एखाद्या घटकाला त्याचे नुकसानच सोसावे लागते. अशा परंपरा रद्द करणे हेच समाजहिताचे ठरते. नवरा मरतो तेव्हा पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्यातच तिचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे अशा प्रकारांमुळे ती  आणखीनच खचून जाते. अशा चालीरितींना मूठमाती देणेच गरजेचे आहे.

प्रा. भारत बागकर, समाज कार्यकर्ते, धारगळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!